शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे लवकरच ‘शाळाबाह्य़ मूल दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी योजना जाहीर करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केली.
झी समूहातर्फे परळ येथील आयटीसी ग्रॅण्ट मराठा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘झी २४ तास अनन्य सन्मान’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रासाठीचा झी २४ तास अनन्य सन्मान पुरस्कार परमेश्वर काळे यांना तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी तावडे यांनी ही घोषणा केली. ‘लोकसत्ता’ या सोहळ्याचे ‘माध्यम प्रायोजक’ होते.
परमेश्वर काळे यांनी फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सुरू केलेली पालावरची शाळा या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. शाळाबाह्य़ मुलांचा हा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला असून संपूर्ण राज्य भरातील अशा शाळाबाह्य़ मुलांचे लवकरच सर्वेक्षण पूर्ण केले जाऊन त्या सगळ्यांना शाळेत आणले जाईल. त्यानंतर एकही मुलगा शाळाबाह्य़ ठरणार नाही, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. शाळाबाह्य़ विद्यार्थी जर कुठे आढळून आला तर तालुका शिक्षणाधिकाऱ्याच्या वेतनातून अडीचशे रुपये, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या वेतनातून ५०० रुपये आणि शिक्षणमंत्र्यांच्या वेतनातून अडीचशे रुपये असे एक हजार रुपये कापून संबंधिताना देण्यात येतील, असेही तावडे म्हणाले. फासेपारधी समाजातील मुलांना जसा ‘परमेश्वर’ भेटला तसा तो राज्यभरातील मुलांनाही भेटावा, अशी अपेक्षाही तावडे यांनी या वेळी व्यक्त केली.