विविध कामांसाठी ४० दिवसांचा ब्लॉक, उपनगरी रेल्वे वेळापत्रकावर परिणाम

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक असलेल्या लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामांना गती दिली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या उड्डाणपुलाच्या काही कामांसाठी ४० दिवसांचा ब्लॉक डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात येत आहे.

१३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ब्लॉक घेऊन कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी सात महिने लागतील, अशी माहिती देण्यात आली.

रेल्वे, आयआयटी आणि मुंबई पालिकेने केलेल्या तपासणीत लोअर परळ स्थानकावरील उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. १९२१ साली बांधलेला उड्डाणपूल गंजला आहे. कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल पाडण्याच्या काही कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्याला गती मिळाली असून नवीन पुलासाठी पाया खणणे यासह अन्य कामेही १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.२५ ते पहाटे ५.२५ पर्यंत या वेळेत हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे लोकलच्या काही फेऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. चर्चगेट स्थानकातून विरारसाठी सुटणारी पहाटे ४.१५ ची लोकल याशिवाय पहाटे ४.१९, ४.३८ वा, ४.४६ वा आणि ५.०० वाजताची चर्चगेट-बोरीवली धीम्या लोकल मुंबई सेन्ट्रल ते माहिम दरम्यान जलद मार्गावर धावतील. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात या धीम्या लोकल गाडय़ांना थांबा नसेल. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ४० दिवसांच्या ब्लॉकमध्ये पुलासाठी पाया खणणे इत्यादी कामे केली जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी दोन ब्लॉकमध्येही कामे केली जाणार आहेत. रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सात महिने लागतील, अशी माहिती भाकर यांनी दिली.

पुढील लोकल फेऱ्या रद्द

पहाटे ५.०६ वाजता महालक्ष्मी ते बोरीवली

पहाटे ५.२० वाजता महालक्ष्मी ते बोरीवली

सकाळी ६.०७ वाजता बोरीवली ते चर्चगेट

सकाळी ६.२७ वाजता बोरीवली ते चर्चगेट