News Flash

आणखी वातानुकूलित उपनगरी गाडय़ांसाठी प्रतीक्षाच

दुसऱ्या वातानुकूलित गाडीतील दोष दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य राजेश अग्रवाल यांनी मुंबईत दिली.

(संग्रहित छायाचित्र)

 

 

मुंबईत दुसरी वातानुकूलित उपनगरी गाडी दाखल झाली असतानाच त्यात असलेले तांत्रिक दोष आणि एमयूटीपी-३ मध्ये ४७ वातानुकूलित उपनगरी गाडय़ांसाठी पुन्हा काढलेली निविदा यामुळे आणखी वातानुकूलित गाडय़ा सेवेत येण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

दुसऱ्या वातानुकूलित गाडीतील दोष दूर करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य राजेश अग्रवाल यांनी मुंबईत दिली. याशिवाय ४७ वातानुकूलित उपनगरी गाडय़ांसाठी पुन्हा निविदा काढली असून त्यालाही गती देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणाले. त्यामुळे सध्या धावत असलेल्या एकाच वातानुकूलित उपनगरी गाडीवरच प्रवाशांचा ताण पडत आहे.

६४व्या वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभानिमित्त रेल्वेच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन सीएसएमटी येथे भरवण्यात आले होते. त्याला भेट देण्यात आल्यानंतर अग्रवाल यांनी उपनगरी गाडय़ांचा वाढवण्यात येणारा वेग, वातानुकूलित उपनगरी गाडय़ा इत्यादीविषयी माहिती दिली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ला डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प असून ४७ वातानुकूलित उपनगरी गाडय़ांच्या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. या गाडय़ा २०२० पर्यंत मिळणे अपेक्षित होते. रेल्वेच्या चेन्नईतील कारखान्याकडून या ४७ गाडय़ांसाठी काढलेली निविदा नोव्हेंबर २०१८ मध्ये तांत्रिक मुद्दय़ांमुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा मे २०१९ मध्ये निविदा काढण्यात आली. परंतु रेल्वे बोर्डाने तांत्रिक मुद्दे उपस्थित करत चेन्नईतील कारखान्याला जुलै महिन्यात पत्र पाठवून पुन्हा निविदा काढण्याची सूचना केली होती. याविषयी बोलताना अग्रवाल यांनी ४७ वातानुकूलित उपनगरी गाडय़ांसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या गाडय़ा येण्यास आणखी विलंब होणार आहे. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या दुसऱ्या वातानुकूलित उपनगरी गाडीविषयीही बोलताना त्यांनी या गाडीमध्ये तांत्रिक दोष असल्याचे मान्य केले. दोष असल्याने ते दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी यांत्रिक भाग बनवणाऱ्या भेल कंपनीशी आणि चेन्नईतील रेल्वे कारखान्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेली दुसरी वातानुकूलित उपनगरी गाडी तांत्रिक दोषांमुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत अद्यापही आलेली नाही.

खासगी सेवेचा शिरकाव

दिल्ली ते लखनऊ मार्गावर तेजस एक्स्प्रेस खासगी कंपनीमार्फत चालविण्यात येणार असून आयआरसीटीसीकडून या गाडय़ांचे भाडेदर निश्चित केले जाणार असल्याचे रेल्वे बोर्ड अध्यक्ष वी. के. यादव यांनी सांगितले. आणखी काही मार्गही खासगी सेवेसाठी निश्चित करण्याचा प्रयत्न असून तेथेही अशीच योजना अमलात आणली जाईल आणि आयआरसीटीसी भाडेदर निश्चित करील, अशी माहिती यादव यांनी दिली.

मेमू प्रकल्पाला विलंब

गाडय़ांचा वेग वाढवण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. पहिल्या टप्प्यात उपनगरी गाडय़ांचा वेग वाढवण्याचा विचार असून त्यानंतर प्रादेशिक पातळीवरील मेमू गाडय़ांचा वेग वाढवण्याची योजना आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते बडोदा आणि मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी गाडय़ांचा समावेश आहे. मुंबई ते बडोदा आणि मुंबई ते नाशिक मार्गावर ‘वंदे भारत’ गाडय़ांसाठी मेमू प्रकल्प हाती घेण्यात येणार होता. परंतु हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मेमू गाडय़ा उपलब्ध नसल्याने त्याला थोडा विलंब होऊ शकतो, असे अग्रवाल यांनी सांगितले.

उपनगरीय गाडय़ांचा वेग वाढणार?

मुंबई : पश्चिम व मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाडय़ांचा वेग प्रतितास ११० पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य (रोलिंग स्टॉक) राजेश अग्रवाल यांनी दिली. त्यामुळे प्रवास वेगवान होण्यास चालना मिळतानाच वाढीव २० टक्के  फे ऱ्याही प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. सध्या रुळांची क्षमता उपनगरी गाडय़ांसाठी प्रतितास १०० पर्यंत आहे. यावरून धिम्या आणि जलद गाडय़ांचा वेग सध्या ताशी ८० ते ९० पर्यंत आहे. परंतु रुळाची कमी असलेली क्षमता लक्षात घेता या गाडय़ा प्रतितास १००च्या आतच धावतात. त्यामुळे रुळांची वेगाची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेऊन ती ११० पर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल, असेल असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:43 am

Web Title: waiting for more air conditioned suburban trains abn 97
Next Stories
1 ‘महाभरती’वरून पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या कोपरखळ्या
2 वैद्यकीयच्या निम्म्या जागांचे  शुल्क नियंत्रण आयोगाकडे
3 मराठवाडय़ाच्या दुष्काळमुक्तीसाठी गोदावरी खोऱ्यातील पाणी उचलणार
Just Now!
X