विमान प्रवास करताना विमान उशिरा सुटणार आहे किंवा विमानतळावर लवकर पोहोचलो, तर प्रवाशांना अत्यंत सुसज्ज अशा प्रतीक्षालयात थांबवले जाते. रेल्वेच्या प्रवाशांना अशा प्रतीक्षालयाचा अनुभव देण्यासाठी आयआरसीटीसी लवकरच मुंबई सेंट्रल येथे असे सुसज्ज प्रतीक्षालय सुरू करणार आहे. या प्रतीक्षालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात काम सुरू होणार आहे.

वाय-फाय सेवा, आरामदायक खुच्र्या, वातानुकूलित दालन, न्हाणीघर अशा अनेक सुविधांनी हे दालन सुसज्ज असेल. तसेच प्रवाशांना पहिल्या तीन तासांसाठी ३५० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक तासासाठी १२५ रुपये एवढय़ा नाममात्र शुल्कात  वापरता येणार आहे.गुजरात किंवा दिल्ली येथून येणाऱ्या बहुतांश गाडय़ा मुंबई सेंट्रल येथे येतात. मुंबईत एका दिवसाच्या कामासाठी येणारे अनेक जण सुरत, अहमदाबाद, बडोदा किंवा दिल्ली अशा शहरांतून या गाडय़ांनी मुंबईत येतात. अशा प्रवाशांचा विचार करून त्यांच्यासाठी नवी दिल्ली स्थानकातील प्रतीक्षालयाच्या धर्तीवर हे प्रतीक्षालय सुरू होणार आहे. गाडी पहाटे मुंबईत पोहोचली किंवा मुंबईतील काम लवकर झाले आणि गाडी उशिरा आहे, अशा वेळी मुंबईत कुठे थांबावे हा प्रश्न प्रवाशांसमोर असतो. एखाद्या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. अशा प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हे प्रतीक्षालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई सेंट्रल येथील पार्सल कार्यालयाच्या १५०० चौरस फुटांच्या जागेत तयार होणारे हे प्रतीक्षालय दुमजली असेल. या प्रतीक्षालयात एका वेळी १०० प्रवासी थांबू शकतील. प्रतीक्षालयाचा वापर करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला पहिल्या तीन तासांसाठी ३५० रुपये भरून स्मार्ट कार्ड घ्यावे लागेल. त्यात प्रतीक्षालय वापरण्याचा खर्च, वर्तमानपत्र, वाय-फाय यांचा समावेश असेल.

त्याशिवाय सकाळी येणाऱ्या प्रवाशांना नाश्ता, दुपारच्या प्रवाशांसाठी जेवण, संध्याकाळी येणाऱ्या प्रवाशांना चहा-नाश्ता आणि रात्रीच्या प्रवाशांसाठी जेवण, अशी सेवाही येथे नाममात्र दरांत पुरवण्यात येईल. पहिल्या तीन तासांनंतरही प्रवाशांना या प्रतीक्षालयाचा लाभ घ्यायचा असेल, तर प्रति प्रवासी प्रति तास १२५ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. या प्रतीक्षालयाचे बांधकाम पुढील महिन्यात सुरू होणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.