एमआयएमने उत्तर मध्य मुंबई आणि औरंगाबाद या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धरला असला तरी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे आमदार वारिस पठाण यांनी सांगितले. मात्र पक्षाने आदेश दिल्यास लढू, असे पठाण यांनी स्पष्ट केले. इम्तियाझ जलील हे औरंगाबादमधून निवडणूक लढविणार आहेत. एमआयएम लढल्यास काँग्रेस उमेदवाराच्या मतांची विभागणी होऊन भाजप-शिवसेनेला लाभ होणार आहे.

एमआयएमचे आमदार पठाण यांनी उत्तर मध्य मुंबईतून तर जलील यांनी औरंगाबादमधून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आहे. जलील यांनी औरंगाबादमधून तयारीही सुरु केली आहे. तर भायखळा येथील आमदार पठाण यांनी उत्तर मध्य मुंबईत चाचपणी सुरु केली आहे. कुर्ला व अन्य मुस्लिम बहुल भागात त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भेटीही दिल्या. उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या खासदार पूनम महाजन तर काँग्रेसकडून प्रिया दत्त निवडणूक रिंगणात आहेत. पठाण यांच्या उमेदवारीमुळे प्रिया दत्त यांना मतविभागणीचा फटका बसू शकतो व महाजन यांना लाभ होईल.

यासंदर्भात पठाण म्हणाले, काँग्रेसला फटका बसून भाजपला लाभ व्हावा, अशी पक्षाची कोणतीही भूमिका नाही. काँग्रेस व भाजप हे दोन्हीही आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. निवडणूक लढविण्याचा सर्व पक्षांना अधिकार आहे. पण मला लोकसभा निवडणुकीत रस नसून पक्षादेश आल्यास विचार करीन, अन्यथा मला भायखळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचीच तयारी करायची आहे.