आरोग्यास घातक ठरणारा दवाखाने, रुग्णालये आदींमधील तब्बल ५,३७३.५६ मेट्रिक टन जैववैद्यक कचऱ्यावर पालिकेने गेल्या वर्षी प्रक्रिया करून विल्हेवाट लावली असून त्यापैकी विल्हेवाट लावलेला वापरयोग्य १,४०२.०३३ मे. टन कचरा पुनर्वापरासाठी प्लास्टिक पुनर्चक्रीकरण केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबईमधील रुग्णालये, प्रसूतिगृहे, चिकित्सालये, दवाखाने, आरोग्य केंद्र, जनावरांच्या संस्था, प्राण्यांची रुग्णालये, रोगशास्त्र प्रयोगशाळा, रक्तपेढी आदींमधून दररोज मोठय़ा प्रमाणावर जैववैद्यक कचरा निर्माण होत असतो. हा कचरा इतरत्र फेकल्यास त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पालिकेने गेल्या वर्षभरात वरील सर्व संस्थांमधून तब्बल ५,३७३.५६ मे. टन कचरा गोळा केला. हा कचरा गोळा करण्यासाठी चारही बाजूंनी बंद असलेली ४९ वाहने पालिकेने उपलब्ध केली असून चिंचोळ्या गल्ल्यांमधील दवाखाने, रुग्णालये आदींमधील कचरा गोळा करण्यासाठी विशिष्ट वाहने सज्ज केली आहेत. या वाहनांवर जीपीएस प्रणाली जोडण्यात आली असून त्यामुळे पालिकेला या गाडय़ांवर करडी नजर ठेवणे शक्य झाले आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईमधून गोळा करण्यात येणाऱ्या जैववैद्यक कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रकारानुसार वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये ठेवला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर दोन प्रकारे प्रक्रिया केली जाते. पहिल्या प्रक्रियेमध्ये मानवी शरीरशास्त्रविषयक कचरा, प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा कचरा-भाग, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैविक तंत्रशास्त्र कचरा, निरुपयोगी औषधे, रक्तमिश्रित कचरा आदी अत्यंत उच्च तापमानास ज्वलन भट्टीमध्ये जाळण्यात येतो. या कचऱ्यातून निर्माण होणारी राख कचराभूमीत योग्य प्रकारे टाकण्यात येते. दुसऱ्या प्रक्रियेत रुग्णालये, दवाखाने आदींमधील अन्य कचरा र्निजतुकीकरण यंत्रामध्ये अथवा रासायनिक प्रक्रिया करून र्निजतुक केला जाते. त्यानंतर ‘श्रेडर’मध्ये त्याचा बारीक भुगा करण्यात येतो आणि तो प्लास्टिक पुनर्चक्रीकरण केंद्राकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवून देण्यात येतो. गेल्या वर्षी गोळा झालेल्या ५,३७३.५६ मे. टन जैववैद्यक कचऱ्यापैकी १,४०२.०३३ मे. टन कचरा संपूर्ण प्रक्रियेअंती प्लास्टिक पुनर्चक्रीकरण केंद्राकडे पाठवून देण्यात आला. उर्वरित कचरा भट्टीमध्ये भस्मसात करण्यात आला.
जैववैद्यक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम पालिकेने एसएमएस इन्होक्लीन प्रायव्हेट कंपनीवर सोपविण्यात आले असून या कामासाठी या कंपनीला देवनार कचराभूमीजवळ ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर भूखंड देण्यात आला आहे. तेथे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते.