07 March 2021

News Flash

टंचाईआधीच पाणी आटले!

पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबईच्या काही भागांत २६ व २७ सप्टेंबर  रोजी कामे हाती घेण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील विविध भागांत अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी; वितरण त्रुटी, सदोष जलवाहिन्यांतील दोष कारणीभूत

यंदा सुरुवातीचे तीन महिने झालेल्या मुबलक पावसामुळे पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी आशा करणाऱ्या मुंबईकरांना वेगळ्याच कारणांमुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वितरण यंत्रणेतील त्रुटी आणि सदोष जलवाहिन्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वांद्रे, कुलाबा, शीव, चेंबूर आदी परिसरांना कमी दाबाने व अपुऱ्या वेळेत पाणीपुरवठा होऊ लागला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी या मुद्दय़ावर प्रशासनाला धारेवर धरले. मात्र जलवाहिन्यांच्या जोडणीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठय़ात सुधारणा होईल, एवढय़ा आश्वासनावर प्रशासनाने वेळ मारून नेली.

वांद्रे परिसरामध्ये काही भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची तक्रार काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी केली. गेले चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी पालिकेने ३०० कोटी रुपये खर्च केले. मात्र नागरिकांना आजही मुबलक पाणी मिळू शकलेले नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा प्रकल्प अपयशी ठरल्याचा आरोप झकेरिया यांनी यावेळी केला. तक्रार केल्यानंतर एका विभागात अधिक पाणी मिळते, तर त्याच वेळी दुसऱ्या विभागात पाणी टंचाई निर्माण होते, ही बाबही आसिफ झकेरिया यांनी निदर्शनास आणून दिली.

पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबईच्या काही भागांत २६ व २७ सप्टेंबर  रोजी कामे हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता या भागात अत्यंत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. डोंगराळ भागात तर पाणीच पोहोचत नाही, अशी व्यथा शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी मांडली. शीव परिसरातील काही सोसायटय़ांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या सोसायटय़ांना टँकरने पाणी मागवावे लागत असल्याची बाब भाजप नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी निदर्शनास आणून दिली.

जलवाहिन्यांच्या जोडण्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठय़ात सुधारणा होईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशयातील पाण्याची पातळी वाढण्याऐवजी घसरली आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा येत आहे. मुंबईकरांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे इमारत बांधकाम आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा रोखणार का, असा सवाल भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केला.

तलावांतील जलसाठय़ाचा मासिक आढावा

कमी पाऊस झाल्यामुळे यंदा तलावांमध्ये तब्बल एक लाख १३ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे दर महिन्याला तलावांतील जलसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीपुरवठय़ाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांनी सांगितले. कुलाब्यामध्ये काही ठिकाणी वाहिन्या टाकण्याची गरज असून ही कामे पूर्ण झाल्यावर तेथील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. कुलाब्यात सुरळीत पाणीपुरवठा असल्याचे उत्तर सादर करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हस्तक्षेप करीत सदस्यांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 3:39 am

Web Title: water came down before the scarcity
Next Stories
1 चेंबूर तरणतलावाची महिनाभरात दुर्दशा
2 राजभवनची शोभा असलेले मोर संकटात
3 घटना स्थळ : प्रभादेवीचा खाडा
Just Now!
X