चेंबूरमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप; आधी पाण्याचा उपसा, मग पावसाची प्रतीक्षा

पावसाच्या भरवशावर राहण्याची मोठी किंमत सध्या मुंबई महापालिकेला मोजावी लागत आहे. चेंबूर परिसरातील हजारो गणेशमूर्तीचे विसर्जन होत असलेल्या चरई येथील तलावातील गाळ आणि पाण्याचा उपसा करणाऱ्या पालिकेने पावसात हा तलाव पूर्ण भरण्याची प्रतीक्षा केली. मात्र, गेले १५ दिवस पावसाने पाठ फिरवल्याने आता गणेश विसर्जनात विघ्न येऊ नये, यासाठी आता पालिकेने या तलावात टँकरने पाणी भरणे सुरू केले आहे. तलावाच्या स्वच्छतेचे योग्य नियोजन न केल्यामुळे पालिकेला आता करदात्यांचा पैसा असा पाण्यात घालवावा लागत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

चेंबूर परिसरातील गणेश विसर्जनासाठी सर्वात मोठा तलाव म्हणून चरई तलावाची ओळख आहे. या तलावामध्ये दरवर्षी हजारो घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होते. पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाअंतर्गत हा तलाव येत असून दरवर्षी डागडुजीच्या नावाखाली पालिका या ठिकाणी करोडो रुपये खर्च करते. मात्र वर्षभरानंतर पुन्हा तशाच प्रकारची कामे काढून पुन्हा करोडो रुपये कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या घशात घालण्याचे काम पालिका अधिकारी या ठिकाणी करीत आहेत.

गणेश उत्सवापूर्वी तलावातील गाळ काढून तो स्वच्छ केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावाची स्वच्छता पावसाळा सुरू झाल्यानंतर पालिकेकडून करण्यात येते आहे. तरीही पावसाळ्यात हा तलाव पूर्णपणे पाण्याने भरून जातो. त्यामुळे सफाईसाठी पालिकेला महिनाभर पंप लावून पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यानंतरही सतत पाऊस सुरू राहत असल्याने पाण्याचा उपसा करण्यासाठी दोन महिन्यांचादेखील अवधी लागतो. पाणी उपसण्यासाठी पालिकेला दरवर्षी आठ ते दहा लाखांचा खर्च येतो. त्यानंतर काही प्रमाणात पाणी आणि गाळ काढून तात्पुरती सफाई करण्यात येते. मात्र कंत्राटदार या सफाईसाठी पूर्ण पैसे पालिकेकडून वसूल करतो.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार या ठिकाणी सुरू असून या वर्षी तर पालिकेने कहरच केला. पालिकेने तलावाच्या सफाईलाच उशिरा म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुरुवात केली. जून-जुलैमध्ये जोरदार पाऊस झाल्याने हा तलाव या वर्षी पूर्णपणे भरला होता. मात्र पालिकेने ऑगस्ट महिन्यात पंप लावून तलावातील पाणी पूर्णपणे उपसले. पाऊस पडून तलाव भरेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या महिनाभरापासून मुंबईत पावसाने दडी मारल्याने तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे पालिकेने गणेश उत्सवाच्या तोंडावर टँकरने पाणी घालून हा तलाव भरण्याचा अजब प्रताप केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवस-रात्र टँकरने पाणी आणून या तलावात सोडले जात आहे. गेल्या दोन दिवसांत दोनशेपेक्षा अधिक टँकर-पाणी या ठिकाणी सोडण्यात आले असून यासाठी पालिकेच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्च झाले आहे. एका टँकरसाठी तेराशे रुपये पालिका खर्च करीत असून पावसाळ्यात अशा प्रकारे पाण्यावर पालिका लाखो रुपये खर्च करत असल्याने सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तलावाच्या पाण्याला भ्रष्टाचाराचा रंग?

पाच वर्षांपूर्वी पालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करत तलावाला संरक्षण भिंत बांधली. मात्र त्याच वेळी याच परिसरातील एका विकासकाच्या फायद्यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी तलावाचा घेर चार ते पाच फुटांनी कमी करून विकासकाच्या इमारतीकडे जाणारा रस्ता प्रशस्त करून दिला. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी पुन्हा दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करत पालिकेने या ठिकाणी गणेश घाट आणि तलावाच्या बाजूला सुशोभीकरण आणि विजेचे दिवे लावले. मात्र आजपर्यंत येथील एकही दिवा सुरू झालेला नाही, तर काही दिवसांपूर्वीच या तलावाचे मुख्य प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असताना ते तोडून स्थानिक लोकप्रतिनिधीने या ठिकाणी पुन्हा डागडुजीचा घाट घातला आहे. यासाठीदेखील पालिकेने लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तलावात टँकरने पाणी भरण्याची वेळ याच वर्षी आली आहे. या वर्षी सफाईचा प्रस्तावच मे महिन्यात आला. त्यानंतर फाइल पुढे जाऊन प्रस्ताव मंजूर होईपर्यंत वेळ लागला. त्यामुळे कामाला उशीर झाला आहे.

– तानाजी घाग, पालिका साहाय्यक आयुक्त, एम पश्चिम