विहीर खोदून बेकायदा पाणी विक्री केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

काळबादेवी परिसरात मागील २० वर्षांपासून विहिरीतील पाणी चोरून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ७३ कोटी १७ लाख रुपयांची पाण्याची बेकायदा विक्री केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काळबादेवी परिसरातील बोमनजी मास्टर लेन मार्गावरील पंडय़ा मेन्शनमध्ये असलेल्या दोन विहिरींतून पाणी काढून त्यांची टँकरद्वारे बेकायदा विक्री केली जात होती. याप्रकरणी त्रिपुराप्रसाद पंडय़ा, प्रकाश पंडय़ा, मनोज कुमार, अरुण मिश्रा, धीरज मिश्रा, श्रवण मिश्रा यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेशकुमार धोका यांनी पंडय़ा मेन्शन इमारतीत २००३ मध्ये कार्यालयासाठी गाळा भाडय़ाने घेतला. त्यावेळी इमारतीच्यापरिसरात मोकळ्या जागेत एक विहीर होती. त्या विहिरीतून मालक त्रिपुराप्रसाद आणि अरुणकुमार मिश्रा हे संगनमत करून पाण्याची विक्री करत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. यासाठी अरुणकुमार याने १९९७ साली त्रिपुरादास यांच्याशी करार केला होता, असेही तक्रारीत म्हटले आहे. विहिरीतून पाणी देण्याच्या बदल्यात अरुणकुमार त्रिपुराप्रसाद यांना दरमहा १८ हजार रुपये इतकी रक्कम देत असत, असा आरोप केला आहे.

याबाबत धोका यांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे तक्रारकेली होती. बेकायदा पाणी काढल्यामुळे पालिकेनेही आरोपींवर कारवाई केली होती. तसेच पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप आणि मोटार जप्त केली होती. मात्र त्रिपुराप्रसाद आणि अरुणकुमार कारवाईनंतरही पुन्हा काही दिवसात नवीन पाइप लावून त्याद्वारे पाण्याचा उपसा करत असत, असाहीआरोप आहे.

सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पाण्याच्या टँकरची वाहतूक करण्यास २००५ सालापासून वाहतूक पोलिसांनी बंदी घातली होती. तरीही रस्त्याच्या कडेला टँकर लावून त्यामध्ये पाण्याचा भरणा करूनत्याची सर्रास विक्री केली जातहोती. वाहतूक पोलिसांनी २००५ मध्ये १९७ वेळा कारवाई करत सुमारे ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपीने २००८ नंतर याच जागेत दुसरी विहीर खोदली.

विहिरींतून पाणी उपसा करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र तरीही आरोपींनी अवैधरीत्या बेस्टकडून वीज मिळविली. त्यासाठी दुकानाच्या परवाना पत्राचा वापर करण्यात आला. विहिरीवर दोन पंपांच्या साहाय्याने त्यांनी पाणी उपसा सुरू ठेवला होता. त्यातील एका पंपासाठी बेस्टने २००६ ला वीज जोडणी दिली. तर दुसऱ्या पंपाला २०११ साली वीज जोडणी दिली.

या काळात आरोपींनी ५ हॉर्स पॉवर आणि ३ हॉर्स पॉवरच्या मोटारींच्या माध्यमातून पाणी उपसा केला. तसेच वापरलेल्या वीज बिलांनुसार दोन्ही मोटारींद्वारे सुमारे १ लाख ५२ हजार ४२० तास अवैधरीत्या पाणी उपसा केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एकूण ६ लाख ९ हजार टँकर पाण्याची विक्री केली. त्यातून सुमारे ७३ कोटी १८ लाख रुपयांच्या पाण्याची बेकायदा विक्री केल्याचा आरोप धोका यांनी तक्रारीत केला आहे.

विहीर बंद करण्याचा आदेश

विहिरीतून बेकायदा पाणी उपसा होत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत असते. याबाबत मी वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र कारवाईनंतरही पाणी उपसा सुरूच होता. परिसरात पाणी साठल्याने २०१५ मध्ये माझ्या मुलाला डेंग्यू झाला होता. त्यानंतर माहिती अधिकारातून माहिती मागविली असता विहीर खोदाईसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, हे समोर आले. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली. लवादाने विहीर बंद करण्याचा आदेश दिला होता, असे   तक्रारदार सुरेशकुमार धोका यांनी सांगितले.