राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीनं राज्यात सरकारच्या कारभारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहेत. यातील पहिली पत्रकार परिषद विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या कामावर चौफेर टीका केली. पण, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आमची इच्छा नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

फडणवीस म्हणाले, “एका वर्षात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. कुठल्याही घटकाचं ते समाधान करु शकलेलं नाही. सरकारच्या तीन पक्षात कुठलाही समन्वय नाही. वीजेच्या पश्नावर त्यांनी घुमजावं केलं. ज्या प्रकारे बदल्यांचे दलाल आज फिरत आहेत आणि जी अवस्था आपल्याला पहायला मिळतेय ती तर पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही नव्हती.”

मुख्यमंत्र्यांची ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही; फडणवीसांचं प्रत्युत्तर

“बदल्यांव्यतिरिक्त तर कुठलाच कारभार या सरकारमध्ये होताना दिसत नाही. म्हणूनच एक वर्षाच्या निमित्ताने अपयशी ठरलेल्या या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना मी एवढचं सांगेन की तुम्ही मुख्यमंत्र्यांसारखे वागा. संयम हा तुमच्या बोलण्यात आणि कृतीत दोन्ही ठिकाणी दिसला पाहिजे. आमची राष्ट्रपती राजवटीची मागणी बिल्कुल नाही, पण संविधानिक प्रक्रिया मोडल्याचं आणि सत्तेचा दुरुपयोग या  दोन निर्णयांशिवाय सरकारच्या चुकीच्या कारभाराचं वेगळं उदाहरण काय हवं आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी सरकारवर कोरडे ओढले.

अमृता यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाले…

“आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष आहोत. विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जी भूमिका दिली आहे, त्या भूमिकेचं आम्ही नीट पालन करु आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आवश्यकता भासल्यास रस्त्यावर उतरु. याबाबत तुम्ही पंतप्रधानांकडे आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी तुमच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावचं लागेल, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.