संदीप आचार्य

तुमच्याकडे आलेल्या तापाच्या किंवा अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांमधून करोनाचा रुग्ण नेमका कसा ओळखायचा हे आता तुमच्या लक्षात आले असेल… लक्षात ठेवा आलेल्या रुग्णाचे वय, त्याला मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार किंवा श्वसनाचा काहीही त्रास असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला सांगितलं आहे. आपल्याला करोनाचे मृत्यू रोखायचे आहेत आणि ते आपल्या हातात आहे, असं म्हणत डॉ. संजय ओक यांनी वेबिनारद्वारे आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या डॉक्टरांशी संवाद साधला.

करोनाचे रुग्ण केवळ मुंबई व पुण्यापुरते मर्यादित राहिले नसून राज्याच्या वेगवेगळ्या भागात रुग्ण हळूहळू वाढत आहेत. खासकरून राज्यातील व परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी परत पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नव्याने रुग्ण वाढू शकतील हे लक्षात घेऊन, तसेच साथीच्या आजारांचा व डॉक्टर- परिचारिका यांचे मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी वेबिनार मार्गदर्शन संकल्पना अंमलात आणली आहे. मुंबईतील करोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक आणि या टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. उद्वाडिया तसेच डॉ. अविनाश सुपे यांच्यासह मान्यवर डॉक्टरांनी सोमवारी वेबिनारवरून आरोग्य विभागाच्या व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शंभरहून अधिक डॉक्टरांना एपिडेमिक म्हणजे काय, करोनाचे रुग्ण कसे ओळखायचे, रुग्ण व्यवस्थापन, कोमॉर्मिडिडीटीच्या म्हणजे मधुमेह, रक्तदाब, श्वसनविकारादी आजाराच्या रुग्णांवरील उपचाराबाबत सुमारे तीन तासाचे विशेष प्रशिक्षण दिले.

याबाबत आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे म्हणाल्या, “प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या संकल्पनेतून आम्ही हे वेबिनार आयोजित केले. अर्थात सुरुवातीपासूनच आयसीएमआरच्या व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपचार सुरुच आहेत. तथापि वाढते रुग्ण व परिणामकारक नियोजन याची सांगड घालणे व सतत अपडेट राहाणे आवश्यक असल्यानेच आम्ही डॉ. संजय ओक यांना पाचारण केले.” उद्याही अतिदक्षता विभागातील रुग्णोपचार या विषयावर वेबिनार असून यासाठी तब्बल ३५० डॉक्टरांनी आपली नावे नोंदवल्याचे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

“याशिवाय राज्यातील डॉक्टर, परिचारिका व अन्य आरोग्य कर्माचार्यांचे मानसिक आरोग्य बळकट राहाणे गरजेचे असल्याने आम्ही डॉ. कुमावत व केईएमच्या माजी अधिष्ठाता डॉ शुभांगी पारकर यांचेही वेबिनार केले आहे. आगामी काळात डॉ. हरीश शेट्टी यांच्यासह आणखी काही मानसोपचारतज्ज्ञांचे वेबिनार मार्गदर्शन आयोजित करणार असून यात आजारातून बाहेर पडण्यासाठी रुग्णांची मानसिकता भक्कम करण्याला प्राधान्य देणार आहोत,” असं डॉ. तायडे यांनी सांगितले.