गेली पंधरा वर्षे आघाडी सरकारने महाराष्ट्रात केवळ भ्रष्टाचाराचे राजकारण केले. आजूबाजूच्या राज्यांमध्ये २४ तास वीजपुरठा होत असताना महाराष्ट्रात मात्र १६ तास भारनियमन आहे. गुजरात राज्यात गेल्या १२ वर्षात दुष्काळ पडलेला नाही. मात्र, महाराष्ट्राला दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. अशाप्रकारे आघाडी सरकारवर तोंडसुख घेताना राज्यातील जनतेला सत्ताबदल हवा आहे आणि महाराष्ट्रात भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबई भेटीवर असेलेल्या शहा यांनी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच ‘छत्रपतींचा आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ’ हा नारासुध्दा शहा यांनी यावेळी दिला.   
राज्यात आघाडी सरकारने ११ लाख ८८ हजार कोटी रूपये घशात घातले. इतक्या पैशात अनेक लोकोपयोगी कामे करता आली असती. देशात भाजपचे सरकार यशस्वी करायचे असेल तर राज्यातही भाजपचे सरकार आणावे लागेल, असंही शहा म्हणाले. देशाचा शेतकरी ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱयांच्या प्रश्न पुढील काळात योग्यरित्या हाताळला जाईल, असेही ते म्हणाले. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी मिळून काँग्रेसला पराभूत करायचे आहे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन शहा यांनी उपस्थितांना केले.
दरम्यान शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही आदरपूर्वक उल्लेख केला. मात्र, शिवसेना अथवा महायुतीचा उल्लेख करणे टाळले.
अमित शहांच्या उपस्थितीत आघाडीचे बडे नेते भाजपात दाखल
शहांनी पंतप्रधानांबद्दल स्तुतीसुमनेही यावेळी उधळली. कित्येक वर्षांनंतर मनातलं स्पष्टपणे बोलणारा पंतप्रधान भारताला मिळाला आहे. नरेंद्र मोदी भारताच्या विकासासाठी २४ तास प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जागावाटपामध्ये लक्ष घालू नये. घराघरात जाऊन मोदींचा संदेश पोहोचवा आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पाळेमुळे उखडून टाकण्याचा निर्धार करा असे आवाहन शहा यांनी यावेळी केले.