उन्हाळ्यात सतत घाम का फुटतो? पावसाळ्यात लाटा अधिकाधिक उंच का उसळतात? ऑक्टोबर हीट का जाणवते? अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात सध्या वादळे का येत आहेत? डिसेंबरमध्ये थंडी का पडते? या सगळ्याचे त्या बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे एकच उत्तर आहे. ते म्हणजे वारा. आता नोव्हेंबरमध्ये सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन पडण्याचे कारण हाच वारा आहे. राज्याच्या अंतर्गत भागात तापमान १५ अंश से. खाली जाण्यासाठी आणि पश्चिम किनारपट्टीवर मात्र त्याचवेळी थंडी न पडण्याचे कारणही हाच वारा आहे. उत्तरेत बर्फवृष्टी करण्यासाठी आणि त्याचवेळी तामिळनाडूत पाऊस पडण्यासाठीही वाराच कारणीभूत आहे. पृथ्वी तिच्या अक्षापासून २१ अंश कललेली आहे आणि त्यामुळे ऋतुचक्र सुरू राहते हे आपल्याला माहिती असते. पण त्यामागची कारणमीमांसा मात्र माहिती नसते. खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे हे सर्व वारे भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील रिकाम्या जागा भरण्यापुरतेच राहिल्याने हवा का बदलते याची उत्तरे अनुत्तरित राहतात. पण अनेकदा ‘आज वातावरण असे का आहे,’ या प्रश्नावर एकच उत्तर असते ते म्हणजे वाऱ्याची बदललेली दिशा किंवा वेग किंवा वेळ.

वारा ही सदीश राशी आहे. त्याला वेग आणि दिशा दोन्ही आहेत. वातावरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वाऱ्याचा वेग व दिशा बदलत असतात. एकाच ठिकाणी जमिनीच्या लगत असलेली वाऱ्याची दिशा व वातावरणाच्या वरच्या पातळीवर असलेली दिशा वेगळी असू शकते व त्यामुळे हवामानावर परिणाम होतो. त्याचवेळी पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वाहणारे वारे व त्यांचा एकमेकांशी असलेला संबंधही अतिशय गुंतागुंतीचा आहे. मात्र आपल्या रोजच्या हवामानातील बदल समजून घेण्यासाठी एवढय़ा खोल बुडी मारण्याची गरज नाही.

Rain in summer in Nagpur risk of disease increase
नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
grape summer cooler juice recipe
Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर

वर्षभरातील आपल्या ऋतूंचे निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की डिसेंबर ते नोव्हेंबर अशा वर्षभरात वारे घडय़ाळाच्या काटय़ांच्या विरुद्ध दिशेने (अ‍ॅण्टिक्लॉकवाइज) आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे डिसेंबरमध्ये वारे उत्तरेकडून मुंबई व राज्यात येतात. उत्तर भारतातील कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी येथून वाहणारे हे वारे सोबत गारवा घेऊन येतात. जानेवारी-फेब्रुवारीत ही दिशा वायव्येकडून (घडाळ्यातील दहा-अकरा दरम्यान) असते आणि त्यामुळे थंडीची तीव्रता वाढते. मार्चमध्ये वारे पश्चिमेकडून (घडाळ्यातील नऊचा अंक) म्हणजे समुद्राकडून जमिनीवर येण्यास सुरुवात होते. हाच हिवाळ्यातून उन्हाळ्याच्या स्थित्यंतराचा काळ. या वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण फारसे नसते आणि त्याचा प्रभाव जास्त नसल्याने राज्याच्या अंतर्गत भागातही उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होतो. जमीन तापून हवेचा दाब कमी होऊ लागतो. त्याचवेळी समुद्र मात्र फारसा तापलेला नसल्याने समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू वाऱ्याच्या काटय़ाची सुई सात ते आठ या अंकाकडे येते. नैऋत्येकडून येणारे हेच ते पावसाचे वारे. मे महिन्याच्या अखेरपासून सुरू होणारे हे वारे सोबत प्रचंड बाष्प घेऊन येतात. यांचा वेगही अधिक असतो. तब्बल चार महिने या वाऱ्यांमुळे आपल्याकडे पाऊस पडतो. सप्टेंबरपासून या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. ऑक्टोबरच्या मध्यावर ते निष्प्रभ होतात. मात्र आता स्थिती उलट झालेली असते. जमीन थंड झालेली असते व तुलनेने समुद्र मात्र दमट, उष्ण असतो. त्यामुळे ईशान्येकडून समुद्राच्या दिशेने वारे वाहू लागतात. हेच वारे सध्या ईशान्य भारतात व तामिळनाडूमध्ये पाऊस पाडत आहेत. त्याचवेळी पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या अंतर्गत भागातही तापमान खाली गेले आहे. हे वारे कोरडे आणि मंद वेगाने वाहतात. हा देखील ऋतूबदलाचा काळ आहे. पुढच्या महिन्यात वारे पुन्हा उत्तर दिशेने वाहायला सुरुवात होईल आणि वाऱ्याचे घडय़ाळाच्या काटय़ाच्या उलट दिशेने होणाऱ्या प्रवासाचे एक चक्र पूर्ण होईल.

हे झाले देशाचे. आता आपले स्थानिक हवामान. सध्या मुंबई-ठाणे-नवी मुंबईत सकाळी गारवा असतो आणि दुपारी मात्र उन्हाचा ताप असतो. त्याचे कारण सध्या वारे पूर्वेकडून म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहत आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे समुद्री वाऱ्यांप्रमाणे या वाऱ्यांचा वेग जास्त नसतो किंवा त्यात बाष्पही नसते. राज्याच्या अंतर्गत भागात या वाऱ्यांना कोणताही अडथळा नसतो आणि त्यामुळे तेथील तापमान खाली उतरते. मात्र पश्चिम किनारपट्टीवरील समुद्री वारे व हे जमिनीवरील वारे एकमेकांना विरुद्ध दिशेने ढकलत राहतात. सकाळच्या वेळेस पूर्वेकडील वारे भारी पडले की पश्चिमेकडून सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत सुरू होत असलेल्या समुद्री वाऱ्यांची वेळ टळते. ही वेळ टळली की इथे सूर्यदेव डोक्यावर येऊन त्यांची ९० अंशातील किरणे कोणत्याही अडथळ्याशिवाय जमिनीवर पोहोचवतात व तापमान झरझर वाढते. त्यातच समुद्री वाऱ्यांमधील बाष्प या जमिनीवरील कोरडय़ा वाऱ्यांमध्ये नसते. त्यामुळे तापमान नियंत्रणात ठेवणारा बाष्पासारखा घटकच नसल्याने तापमान ३५ अंश से.ची पायरी सहजी ओलांडते. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये तापमान वाढण्याचे हेच कारण आहे.

या समुद्री वाऱ्यांचा मुंबई, ठाण्यासारख्या किनाऱ्यावर असलेल्या शहरांमधील हवामानावर अतिशय प्रभाव असतो. त्यामुळेच या शहरात वर्षभर उष्ण व दमट (अनेकदा घाम काढणारे) हवामान असते. थंडी तर केवळ दोन महिने आणि तीही गारवा म्हणण्यापुरतीच पडते. दिल्लीकर रंगीबेरंगी शाली आणि धुक्याची मजा घेत असताना मुंबईकरांना मात्र ते केवळ सहलीतच अनुभवायला मिळते. या सगळ्यासाठी वाराच कारणीभूत आहे. मात्र या वाऱ्याचे आणखी एक महत्त्व आहे. दिल्लीपेक्षा जास्त नसले तरी दिल्लीएवढेच प्रदूषण मुंबई महानगरात होत असते. समुद्राकडून येणारा वारा नसता तर दिल्लीत या काळात वाराच नसल्याने प्रदूषणाची जी काही आपत्कालीन स्थिती ओढवली आहे ती आपल्यावरही ओढवली असती.

 प्राजक्ता कासले

prajakta.kasale@expressindia.com