दूध भुकटीवर ५० रुपये तर दूधाच्या निर्यातीवर ५ रुपये अनुदान देऊ, असे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरु असलेल्या दूध आंदोलनात सहभागी होऊ नये असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.


जानकर म्हणाले, माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी दूध आंदोलनात सहभागी होऊ नये. आम्ही दुध भुकटीवर ५० रुपये प्रतिकिलो तर ५ रुपये प्रती लिटर दुध निर्यातीवर अनुदान देऊ. त्याचबरोबर दुधावर ५० टक्के अनुदान देण्याचा सरकारचा विचार असून यामध्ये ४० टक्के राज्य शासन आणि १० टक्के केंद्र सरकार अनुदान देणार आहे.

प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकाच्या खात्यात जमा करावे, अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्यभरात दूध आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील विविध भागात संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले. तर काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या. मुंबईला होणारा दुधाचा पुरवठा तोडण्याचा संघटना प्रयत्न करत आहे. दुसरीकडे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारही प्रयत्न करत असून रविवारी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. यावर खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  या पार्श्वभूमीवर जानकर यांनी शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक करून खासदार राजू शेट्टी सकाळी मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर दूध आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान, कोल्हापूरात गोकूळ दूध संघाचे आज संकलन बंद करण्यात आले. सोलापूरात दूधपंढरीचे जिल्ह्यातील दूध संकलन बंद होते. नाशिकहून दुधाचे १५ टँकर पोलिसांच्या संरक्षणाखाली मुंबईला रवाना: रवाना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनी सांगितले.

दरम्यान, दूध आंदोलनावरून विरोधकांनी विधीमंडळात अधिवेशनादरम्यान सभात्याग केला. तसेच राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा देत विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. काँग्रेससह या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही पाठींबा दर्शवला आहे.