ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड स्थानकादरम्यानच्या पुलावर हातोडा, वाहनचालकांना मनस्ताप

मुंबई : चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन फेररे उड्डाणपूल १६ जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन पूल उभारणीसाठी साधारण सहा महिन्यांच्या कालावधी लागणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड परिसरातील वाहनचालकांना मनस्ताप होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड स्थानकादरम्यान असलेला फेररे उड्डाणपूल १९२१ साली बांधण्यात आला. धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला हा पूल महिन्यापूर्वी अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. आता या पुलावर हलक्या वाहनांनाही बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

पुनर्बाधणीसाठी हा उड्डाणपूल १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार होता. मात्र पूल बंद करण्याआधी त्यावरील विविध सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्यांच्या केबल्स, वायर १४ जानेवारीपर्यंत काढण्याच्या सूचना पश्चिम रेल्वे प्रशासनाने केल्या होत्या. ती कामे अद्यापही झालेली नाहीत. त्यामुळे १६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हा उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी काही उड्डाणपुलांवर हातोडा?

मुंबई सेन्ट्रल रेल्वे हद्दीतील बेलासिस उड्डाणपूल, दादर स्थानक हद्दीतील टिळक उड्डाणपूल, महालक्ष्मी स्थानकाबाहेरील उड्डाणपूल, रे रोड स्थानकाजवळील उड्डाणपूल, करी रोड व घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच उड्डाणपुलांची पुनर्बाधणी करणे गरजेचे आहे का हे स्पष्ट होईल. रेल्वे मंत्रालय, मुंबई पालिका, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेडकडून या पुलांचे काम होणार आहे.