पश्चिम रेल्वेवरील अपघातानंतर प्रशासनाला जाग

चर्चगेटच्या दिशेने वेगाने जाणारी लोकल गाडी रूळांवरून घसरून पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघाताने मध्य रेल्वेची झोप उडवली असून असे प्रकार टाळण्यासाठी मध्य रेल्वेने काही तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत. हा अपघात चाक तुटल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने आता महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी मध्य रेल्वेवरील सर्वच गाडय़ांच्या चाकांची चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मध्य रेल्वेच्या ताफ्यात विविध प्रकारच्या १२१ गाडय़ा असल्याने ही चाचणी पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असला, तरी त्यात कोणतीही कसर ठेवू नये, असे महाव्यवस्थापकांनी आदेशात म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात १२ डब्यांच्या सीमेन्स, डीसी-एसी, रेट्रोफिटेड, भेल अशा विविध प्रकारच्या गाडय़ा आहेत. त्याशिवाय हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या गाडय़ा आहेत. या सर्व गाडय़ांची चाके तपासण्याचे आदेश ब्रिगेडिअर सूद यांनी दिले आहेत.

एकमेकांना छेद देणाऱ्या रुळांचीही तपासणी
मध्य रेल्वेवर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हार्बर मार्गावर गाडी रूळावरून घसरण्यामागे नेमके कोणते कारण आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र रुळांवरून रेल्वे घसरण्याच्या घटना गेल्या वर्षी आणि यंदाही नेमक्या एकमेकांना छेद देणाऱ्या रुळांच्या ठिकाणी (क्रॉसओव्हर पॉइंट्स) घडल्या आहेत. हे लक्षात घेता मध्य रेल्वेवर या क्रॉसओव्हर पॉइंट्सच्या देखभाल दुरुस्तीकडे अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे.