नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याच्या मुद्दय़ावरून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुसून बसले असताना ते यावरुन नाराज नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजनाथ सिंग यांनी केला. अडवाणींच्या नाराजीमागे ‘अंदरकी बात है’ असे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. उलट आता काँग्रेसनेच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
अडवाणी यांच्या नाराजीवरुन भाजपमध्ये वादळ निर्माण झाले असताना मुंबई दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंग यांनी वांद्रे येथील रंगभवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र अडवाणी हे मोदींच्या उमेदवारीच्या मुद्दय़ावर नाराज नाहीत. घोषणा झाल्यावर मोदी हे त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते, असे स्पष्ट केले. यावर प्रश्नांची सरबत्ती झाली असता त्यांनी ‘अंदरकी बात है’ सांगून गुगली टाकली आणि कारणे गुलदस्त्यातच ठेवली. अडवाणी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते व कुटुंबप्रमुख आहेत. त्यांना आम्हाला सूचना करण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या मताला पक्षात महत्त्व असल्याचेही सिंग यांनी सांगितले. पक्षात नेतृत्वावरून संकट किंवा संदिग्धता नाही, असे स्पष्ट करून आता काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे प्रतिपादनही सिंग यांनी केले. काँग्रेसच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे काही काँग्रेस नेते सांगत आहेत. सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान कारभार करीत असताना अन्य कोणी व्यक्तीचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे येणे, असे उदाहरण दुसरे दिसणार नाही, अशी खिल्लीही राजनाथसिंह यांनी उडविली.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडी बहुमत मिळवेल, असा विश्वास व्यक्त करून निवडणुकीपूर्वी व नंतरही काही राजकीय पक्षांशी युती होईल, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. मनसेचा समावेश युतीमध्ये होणार का, या प्रश्नावर मात्र शिवसेनेसह अन्य पक्षांशी विचारविनिमय करून निर्णय होईल. याबाबत सध्या काहीच चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा झाल्याने पक्षाचे निवडणूक प्रचारप्रमुखपद आता कोणाला मिळणार, मोदी हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का, ते कुठून निवडणूक लढविणार, या प्रश्नांना उत्तरे देताना यासंदर्भात कोणताही निर्णय किंवा चर्चाही झाली नसल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी कोठून व कधी निवडणूक लढवायची, ती लढविलीच पाहिजे, याबाबत कायदेशीर किंवा घटनात्मक अशा कोणत्याही तरतुदींचा अडथळा व बंधन नाही. त्यामुळे योग्यवेळी त्याचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी नमूद केले.