मुंबईत आज शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामात जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून यावरुन शिवसेनेने भाजपावर केलेल्या टीकेमुळे भाजपा संतापली आहे. या मुद्यावरूनच आज शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. यावेळी अक्षदा तेंडुलकर या महिलेस मारहाण झाल्याचेही समोर आले. तर, शिवसैनिकांनी या महिलेस मारहाण केल्याचा आरोप भाजपाकडून करण्या आलेला आहे. तर, या मुद्यावरून भाजपा नेते आता आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे? आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदिराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले.” असं ट्विट करत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“…शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली”; आशिष शेलार यांचा घणाघात!

या अगोदर भाजपा नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणावरून शिवसेनवर घणाघात केला आहे. “ आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणं. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे.” असं शेलार म्हणाले आहेत.

शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

दरम्यान, शिवसेना भवनासमोर झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं –

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.