नयनतारा सहगल यांचा जळजळीत सवाल

देशभरात असहिष्णू वातावरण असताना चित्रपटसृष्टी मूग गिळून गप्प का आहे? त्यांच्यातील एक नामांकित अभिनेते नासीरुद्दीन शहा यांनी या मुस्कटदाबीविरोधात उठवलेला आवाज मला डेहराडूनमध्ये ऐकू आला. परंतु चित्रपटसृष्टीतील एकालाही तो का ऐकू आला नाही? चित्रपटसृष्टी शांत का आहे, असे जळजळीत प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनी मंगळवारी दादर येथे जाहीरपणे उपस्थित केले.

सहगल यांना ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याच्या लज्जास्पद घटनेबद्दल सहगल यांची माफी मागून मराठी जगतात त्यांचे स्वागत करावे, या उद्देशाने मराठी लेखक, कलावंत आणि रसिक वाचकांनी ‘चला एकत्र येऊ  या’ या कार्यक्रमाचे मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजन केले होते.  त्यावेळी सभागृह गर्दीने ओसंडून गेले होतेच, पण नाटय़गृहाची बाल्कनीही भरून गेली होती. या गर्दीसमोर सहगल यांनी आपल्या मनातील सल उघड  केली.

नयनतारा सहगल यांच्याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, प्रा. पुष्पा भावे, डॉ. गणेश देवी,  सुनील शानभाग, नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, टी. एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, प्रज्ञा दया पवार, जयंत पवार, समीना दलवाई, अनंत भावे, अमोल पालेकर, अतुल पेठे, प्रवीण बांदेकर आदी लेखक, कवी, कलावंत, विचारवंत या मेळाव्यात सहभागी होते. डॉ. नेमाडे हे व्हिलचेअरवर असूनही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सहगल म्हणाल्या, ‘‘आपला देश हा बहुसांस्कृतिक असून ही विविधता आपली समृद्धी आहे. ही विविधता एका हिंदू राष्ट्रामध्ये चिणताना ही समृद्धी आपण गमावून बसू. आम्ही हिंदू नाही आम्ही हिंदुस्थानी आहोत.’’

पत्रकार गौरी लंकेश यांच्या जन्मदिनी विद्रोही आवाजावरील दडपशाही झुगारून लावण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असा उल्लेख करत तमिळ गायक टी. एम. कृष्णा यांनी समाजातील अघोरी प्रथा, जातीयवादाविरोधात व्यक्त होऊ पाहणाऱ्या कलावंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील अत्याचारांना आपल्या सुरेल आवाजात तामिळ गीतांमधून वाचा फोडली. कलेवर नियंत्रण हे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचे वास्तव उलगडत पुष्पा भावे यांनी िवदा करंदीकर यांनी सातारा नाटय़संमेलनात सांगितलेल्या पंचमहापापांची आठवण करून दिली. महात्मा गांधी यांची हत्या हे पहिले तर बाबरी मशिदीचा विध्वंस हे पाचवे पाप असल्याचे िवदा म्हणाले होते. त्यांची विधाने खरी होत आहेत. द्वेषपूर्ण कालखंडात आपण जगत आहोत. लेखकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले आहे. दक्षिणायन लिहिणारे लेखक पोलीस संरक्षणात फिरत आहेत. निवडणुकीनंतर कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहील, याची हमी देता येत नाही. कारण लोकशाही संस्थांवर झालेला हल्ला खोलवर आहे, असेही पुष्पा भावे म्हणाल्या.

संध्याकाळी साडेसहापासूनच मराठी रसिकांनी नाटय़गृहाबाहेर गर्दी केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांसह तरुण साहित्यिकांचीही उपस्थिती उत्स्फूर्त होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवि सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांनी केले.

 ही संधीही हुकली..

ज्येष्ठ साहित्यिका आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनाही या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र काही नियोजित कार्यक्रमामुळे त्या येऊ  शकल्या नाहीत, असे सांगताना अमोल पालेकर यांनी मात्र मराठी विश्वातील आणि अमराठी साहित्यातील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वे एका व्यासपीठावर एकत्र येण्याची ती संधी चुकली आणि पुन्हा हीही संधी हुकली, या शब्दांत खंत व्यक्त केली.

कलावंतांचे मौन असह्य़

लेखक हा लिखाणाच्या पातळीवर एकटा असतो. त्याचे एकटेपणाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपण एकत्र येऊ या, असे आवाहन करीत असताना ज्येष्ठ लेखक जयंत पवार म्हणाले, ‘अपमान झाल्याशिवाय मराठी माणूस एकत्र येत नाही. मागे बैल म्हटल्यानंतर हे एकत्र आले होते आणि आता पुन्हा आले आहेत.’

अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत पवार म्हणाले की, केवळ चेहऱ्यावरील प्रसन्नता राखण्यासाठी मौन राखणाऱ्या कलावंतांनी आपण समाजाचा आवाज आहोत हे विसरू नये. त्यामुळे त्यांनी सोयीस्कर मौन बाळगणे ही आत्मवंचना आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरुवात स्वत:पासून, स्वत:च्या कुटुंबापासून सुरू होण्याची वेळ आली आहे, या पवार यांच्या सूचनेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मान्यता दिली.

पारतंत्र्यात ‘स्वातंत्र्य’ हा शब्द उच्चारणेही शक्य नसताना सेन्सॉरशिपला बगल देत अशोक कुमारच्या ‘नया संसार’सारख्या चित्रपटांनी खळबळ माजवली होती. चित्रपटांसारखी माध्यमे केवळ मनोरंजनामध्ये रमली आहेत. आपण एका धोकादायक वातावरणामध्ये जगत आहोत आणि या जगात गप्प राहणे अतिशय धोकादायक आहे. – नयनतारा सहगल