सरकारी पद वा मंत्रीपद नसतानाही भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्रालयासमोरील निवासस्थानात मुक्काम

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसताना त्यांनी मंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्यात आपले बस्तान बसवले आहे. मंत्र्यांची निवासस्थाने व अन्य सरकारी इमारतींची देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून त्याला दुजोरा देण्यात आला. मात्र दानवे यांचा सरकारी बंगल्यातील घरोबा अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याबाबत दानवे यांच्याशी अनेकदा प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही.

राज्यात भाजपच्या हाती सत्ता आल्यानंतर पक्षांतर्गत फेरबदल झाले. केंद्रात राज्यमंत्री राहिलेले दानवे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. मंत्रीपद कायम ठेवून प्रदेशाध्यक्षपद द्यावे, असा त्यांचा पहिल्यापासूनच आग्रह होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्याला मान्यता दिली नाही, उलट ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले तरी मंत्रीपद नसल्याने लाल दिव्याची गाडी, आगे-मागे पोलिसांचा ताफा, दिमतीला नोकर-चाकर, सरकारी मानपान नसल्याने दानवे अस्वस्थ होते. प्रदेशाध्यक्ष राहूनही सरकारी बडदास्त मिळविण्यासाठी त्यांनी राज्य पाहुण्याचा दर्जा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राजशिष्टाचार विभागाने नियमाकडे बोट दाखवून त्यांची डाळ शिजू दिली नाही. नंतर मात्र त्यांना झेड सुरक्षा देऊन पोलीस ताफ्याची इच्छा पूर्ण केली गेली. त्यानंतर दानवे यांनी आपले बस्तान थेट सरकारी बंगल्यातच हलवले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाजूला ‘बी-६’ व ‘बी-७’ हे दोन बंगले आहेत. ‘बी-७’ मध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रहात होते. त्यांना नुकताच मलबार हिल येथील ‘शिवनेरी’ हा बंगला देण्यात आला आहे. ते तिकडे गेल्यामुळे रिकाम्या झालेल्या ‘बी-७’ बंगल्यात आता दानवे राहायला आले आहेत. बाजूच्या ‘बी-६’ या बंगल्यात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे राहतात. ‘बी-७’ ला प्रत्यक्ष भेट दिली असता तेथील कर्मचाऱ्यांनीही या बंगल्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राहात असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखभाल कार्यालयात चौकशी केल्यानंतरही दानवे ‘बी-७’ बंगल्यात राहात असल्याची माहिती देण्यात आली.

या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सुमीत मल्लिक यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे दानवे यांनी मंत्रीपदावर नसतानाही मंत्र्यांसाठीच्या बंगल्यात केलेला घरोबा हा सरकारचे पाहुणे म्हणून, तात्पुरत्या स्वरूपात केला आहे की कायमचा, असे पश्न अनुत्तरीतच राहिले आहेत.

शासकीय नियमांनुसार मंत्रालयासमोरील बंगले हे मंत्री व राज्यमंत्र्यांसाठी दिले जातात. शिवाय विधान परिषदचे उपसभापती व विरोधी पक्षनेत्यांनाही एक-एक बंगला दिला जातो. या पूर्वी एकदा मुख्य सचिवांसाठी व एकदा राज्याचे महाधिवक्ता असलेले श्रीहरी अणे यांना सरकारी निवासस्थान म्हणून त्यांतील एक बंगला देण्यात आला होता.

दानवे सध्या कोणत्याही शासकीय पदावर नाहीत, त्यांना मंत्री वा राज्यमंत्रीपदाचा दर्जा नाही, तरीही सरकारी बंगल्यात त्यांनी बस्तान कसे हलविले आणि त्याला मान्यता कशी दिली असे प्रश्न उपस्थिती झाले आहेत.