ठाणे लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदानाचे काम सुरू असतानाच खोपट एसटी स्टॅण्डमधील मतदान केंद्रावरील महिला अधिकारी वैशाली विठ्ठल भाले (३७) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चक्कर येऊन त्या पडल्या. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहणाऱ्या भाले नेरूळ येथील न्यू बॉम्बे विद्यालयात मुख्याध्यापकपदावर कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहिणी असा परिवार आहे.
भाले यांची  खोपट भागातील एसटी स्टॅण्डमधील मतदान केंद्रावर  नियुक्ती करण्यात आली होती. मतदान सुरू असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना चक्कर आली. केंद्रावरील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
भाले यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असा कयास आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक गौरी राठोड यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून वैशाली यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना ईसीजी तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, निवडणुकीचे काम असल्यामुळे ते आटोपल्यावरच तपासणी करण्याचे त्यांनी ठरविले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वैशाली यांनी आजारी असल्याबाबत निवडणूक आयोगाला कळविले नव्हते, असे जिल्हा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी स्पष्ट केले.
दोन कर्मचारी जखमी
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अंजूरफाटा येथील मतदान केंद्रावर काम करणारे रविकांत म्हात्रे यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील गोकुळदासवाडी येथील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले राबोडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक काशीनाथ महाले यांना चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.