News Flash

..निरक्षर महिलेचा १५ वर्षांचा लढा यशस्वी

अबकारी खात्यात शिपाई म्हणून नोकरी करीत असलेला दारूडा पती व पदरी चार मुले. त्यामुळे सरिताला (नाव बदलले आहे) घरी भांडणे नित्याचीच.

| August 3, 2015 01:05 am

अबकारी खात्यात शिपाई म्हणून नोकरी करीत असलेला दारूडा पती व पदरी चार मुले. त्यामुळे सरिताला (नाव बदलले आहे) घरी भांडणे नित्याचीच. एकदा दारू पिऊन बेफाम झालेल्या पतीला उपचारासाठी एका मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्यात आले. पण विजेचे झटके देऊन उपचार करताना पाऊण तासात तो मरण पावला. डॉक्टरांच्या चुकीमुळे पतीचा मृत्यू झाल्याने भरपाई मिळविण्यासाठीच्या तिच्या लढय़ाला तब्बल १५ वर्षांनी यश आले असून, राज्य ग्राहक मंचाच्या आदेशामुळे तिला सुमारे ३६ लाख रुपये भरपाई मिळणार आहे.
कुर्ला येथे राहणाऱ्या सरिताच्या कबड्डीपटू पतीला दारूचे व्यसन होते. नैराश्यातून तो बेफामही होत असे. तो २७ मार्च, १९९९ रोजी असाच दारू पिऊन आला व बेफाम झाला. त्यामुळे त्याच्या मित्रांबरोबर तिने रात्री साडेआठच्या सुमारास नजीकच्या मानसोपचार डॉक्टराकडे त्याला पाठविले. त्यांनी त्याला विजेचे धक्के (ईसीटी) देऊन उपचार करताच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा तात्काळ मृत्यू झाला. उपचारांमध्ये चूक झाल्याची कबुली डॉक्टरांनी दिली. त्यानंतर सरिताने नुकसानभरपाईसाठी अॅड. शिरीष देशपांडे यांच्यामार्फत राज्य ग्राहक मंचापुढे दावा दाखल करून १६ लाख रुपये भरपाईची मागणी केली. तब्बल १५ वर्षांच्या लढाईनंतर मंचाचे अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी व सदस्य नरेंद्र कवडे यांच्या खंडपीठाने १६ लाख रुपये भरपाईचा दावा दाखल केल्यापासून नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.सरिताचा पती दारू प्यायलेला असताना त्याला विजेचे धक्के देऊन उपचार करणे चुकीचे होते. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची लेखी परवानगी घेतलेली नव्हती, असा अॅड. देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद मंचाचे ग्राह्य़ धरला. उपचार करण्यासाठी तोंडी परवानगी घेतल्याचा बचाव डॉक्टरांनी केला. पण तातडीची गरज नसताना विजेचे धक्के दिले गेल्याने मृत्यू झाला, असा अर्जदारांचा दावा मंचाने मान्य केला व भरपाईचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2015 1:05 am

Web Title: woman fight success after fifteen years
टॅग : Woman
Next Stories
1 बसप बंडखोरांचा नवा पक्ष
2 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूकीची कोंडी कायम
3 डेब्रिज हटवण्यासाठी दूरध्वनी करा..
Just Now!
X