करोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट्स)मध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या तसेच मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर निर्बंध आणण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्य सचिवांना दिल्या.

मंत्रालयात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून सोमवारी महसूल आणि शिक्षण विभागांतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वर्षां’  निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्रालयातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.

त्या वेळी कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज असून त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू, ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि करोनाचा धोकाही कमी राहील.

अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. तसेच करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढल्याचे महासंघाने या वेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर काही प्रमाणात प्रतिबंध असण्याबाबच बैठकीत चर्चा झाली.