|| रसिका मुळ्ये

सहलस्थळांवरून काम करण्याची कंपन्यांची मुभा

मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून अनेक कंपन्यांनी घरातून काम करण्याची दिलेली मुभा घेऊन कर्मचाऱ्यांनी काम आणि सुट्टीचा आनंद एकाच वेळी घेण्यास सुरूवात केली आहे. मार्चपासून वाढू लागलेल्या रुग्णसंख्येनंतर पुन्हा एकदा मुंबई, पुण्यातील कर्मचाऱ्यांनी कार्य-पर्यटनासाठी (वर्केशन) शहराजवळील कर्जत, लोणावळा, माथेरान, इगतपुरीसह गोव्यात धाव घेतली आहे.

गेले सुमारे वर्षभर अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागत आहे. एरवी कचेरी आणि घर अशा दोन वातावरणांत काम करताना साधला जाणारा समतोल बिघडू लागला आहे. घरून काम करताना साचेबद्ध वातावरणातून बाहेर पडताना कामातही खंड पडू नये, यासाठी आता ‘कार्य-पर्यटना’चा पर्याय प्रचलित झाला आहे. पर्यटनस्थळी जाऊन काम करणे आणि भटकणे अशा दोन्हीचा आनंद घेण्याकडे कल वाढला आहे. मार्चपासून मुंबई, पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कठोर निर्बंधांचे संकेत मिळू लागल्यापासून कर्मचाऱ्यांनी पर्यटनस्थळे, रिसॉर्ट शोधून  मुक्कामास सुरूवात केली आहे.

अनेक पर्याय…

मुंबई-पुण्यापासून जवळ असलेल्या अलिबाग, लोणावळा, माथेरान, इगतपुरी ही ठिकाणे आणि विशेषत: गोव्यातील रिसॉर्टस, हॉटेल्सना पसंती मिळत आहे. छोट्या-मोठ्या रिसॉर्टमध्ये एक दिवसाचे शुल्क देऊन राहण्याबरोबरच महिन्याचे शुल्क देऊन स्टुडिओ अपार्टमेंट, पेंटहाऊस येथे गटाने एकत्र राहण्याकडे कल आहे. मुंबई आणि पुण्यातून अधिक कर्मचारी येत असल्याचे माथेरान येथील राधा कॉटेजच्या राधा खेडकर यांनी सांगितले. कोकणातील काही गावांमध्येही पर्यटनाची ही नवी संकल्पना रूजू लागली आहे.

रिसॉर्ट्स सज्ज

‘कार्य-पर्यटना’ची सेवा देणारी रिसॉर्ट्स वाय-फाय, बसून काम करण्यायोग्य शांत ठिकाण आणि गरजेनुसार फिरावे लागल्यास वाहनाची सेवा पुरवतात. त्याशिवाय हेव ते खाद्यपदार्थही पुरवले जातात. तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची हमीही अनेक व्यावसायिक देत आहेत.

कंपन्यांची तयारी

काही कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘कार्यपर्यटना’चा पर्याय दिला आहे. कर्मचाऱ्यांचे गट एखाद्या पर्यटनस्थळी किंवा रिसॉर्टवर जाऊन काम करत असल्यास त्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवतात.

अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यपर्यटनाची परवानगी देत आहेत. काही कंपन्या सुविधाही देत आहेत. शांत जागा, भोजन आणि अन्य सेवा-सुुविधा कर्मचाऱ्यांना देणे अशी अपेक्षा असते. – नम्रता देसाई, बोलभाषा, गोवा</strong>