News Flash

चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमान

गुरुवारी जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या दहा ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

विदर्भासह मध्य भारतात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या दहा ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती. चंद्रपूर तब्बल ४५.३ अंश से. तापमानासह पहिल्या क्रमांकावर होते. मात्र उष्णतेच्या लाटेने पोळलेल्या विदर्भाला शुक्रवारी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीवरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे दोन ते तीन दिवसानंतर या भागात ढगाळ वातावरण होण्याचाही अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे.

गेले चार दिवस राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्यात विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंश  से.हून पुढे गेले आहे. बुधवारी चंद्रपूर येथे या ऋतूमधील सर्वाधिक ४५.४ अंश से. तापमान नोंदले गेले. गुरुवारीही चंद्रपूर येथील तापमानात फारसा फरक पडला नाही. गोंदिया (४४.४), ब्रह्मपुरी (४४.३), अकोला (४४), वर्धा (४४), परभणी (४३.८) येथेही पाऱ्याने लांबचा पल्ला गाठला. विदर्भातील ही सर्व ठिकाणे जगभरातील सर्वोच्च तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये पहिल्या दहामध्ये होती. मराठवाडय़ात व मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या मागेपुढे झुलत होते. त्यामानाने कोकणात बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापमान ३५ अंश से.पर्यंत मर्यादित राहिले. मुंबईत सांताक्रूझ येथे ३५.२ अंश से. तापमान होते. ते सरासरीपेक्षा अडीच अंश से.ने जास्त होते. मात्र हवामान केंद्राने वर्तवलेल्या ३७ अंश से.पर्यंत ते पोहोचले नाही.

शुक्रवारी विदर्भातील तापमान काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हा बदल फार काळ टिकणारा नाही. पुढील आठवडय़ात मध्य भारतात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे.

उपराजधानीत उष्माघाताचे ५० रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीसह पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात तब्बल ५० उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुढे ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

पुण्याचा पारा ४० अंशावर जाण्याची शक्यता ; गुरुवारी हंगामातील ३९.७ अंश उच्चांकी तापमानाची नोंद

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ होरपळत असतानाच पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानातही चांगलीच वाढ झाली आहे. गुरुवारी या हंगामातील ३९.७ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवस शहराचा पारा ४० अंशावर जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या सर्वच भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये सध्या वाढ होत आहे. विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ४० ते ४५ अंशावर पारा असल्याने हा भाग होरपळून निघत आहे. पुणे शहर आणि परिसरामध्येही १६ एप्रिलपासून कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविली जात आहे. १६ एप्रिलला शहराच्या कमाल तापमानाचा पारा ३९.२ अंशावर होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १७ एप्रिलला त्यात वाढ होत ३९.३ अंश उच्चाकी तापमानाची नोंद झाली होती. त्याच दिवशी दुपारनंतर शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी तापमानात किंचितशी घट झाली होती. मात्र, तापमान पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज होता. त्यानुसार गुरुवारी शहरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ होऊन ते २१.४ अंशावर पोहोचले. तापमानाच्या वाढीमुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. अनेक जण दुपारी बाहेर निघणे टाळत असल्याने रस्त्यावरही रहदारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुपारीच नव्हे, तर रात्री आणि पहाटेही हवेत चांगलाच उकाडा जाणवतो आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत तापमान आणखी वाढून पारा ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडय़ात आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रमुख ठिकाणचा पारा (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे ३९.७,जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.७, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.२, सांगली ४०.४, सोलापूर ४२.२, मुंबइ ३४.०, सांताक्रुझ ३५.२,अलिबाग ३२.७,रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४०.१,परभणी ४३.८, अकोला ४४.०, अमरावती ४३.०,बुलडाणा ४१.०,ब्रम्हपुरी ४४.३, नागपूर ४२.२,वर्धा ४४.०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:52 am

Web Title: world highest temperature recorded in chandrapur
Next Stories
1 रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे- आठवले
2 लोकशाही रुजविण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण महत्त्वाचे
3 मानवत तहसीलमध्ये चौघा शेतकऱ्यांकडून विषप्राशन
Just Now!
X