|| नीलेश अडसूळ

 

चित्रीकरणात बाधा येऊ नये म्हणून नवनवीन युक्त्या

मुंबई : शिथिलीकरणानंतर मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली असली तरी शासनाने दिलेले नियम पाळून काम करताना निर्माते, तंत्रज्ञ यांना बरीच तडजोड करावी करावी लागत आहे. विशेष म्हणजे लेखक-दिग्दर्शकांचे काम यात अधिक वाढले आहे. कारण नियमांना धरून संहिता साकारताना आणि करोनाकाळातील अडचणीनुसार संहितेत बदल करताना त्यांना विविध युक्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

चित्रीकरणस्थळी व्यक्तींची मर्यादा, चित्रीकरणातील प्रसंगांबद्दल सूचना, वयाच्या अटी, सेटबाहेरील चित्रीकरणाची जोखीम अशा नाना कारणांमुळे मालिका लेखन करणाऱ्या लेखकांना आपल्या कल्पकतेची तलवार विशिष्ट चौकटीत चालवावी लागत आहे. पर्यायाने दिग्दर्शकांच्याही कल्पनाविस्तारावर मर्यादा आली आहे. ‘झी मराठी’वरील ‘अग्गं बाई सासूबाई’ आणि ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकांचे लेखन करणारे किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा सांगतात, ‘कामाला अनेक मर्यादा आल्या आहेत. या नियमांवर लेखन-चित्रीकरण करणे म्हणजे रावण उभा करा पण दहा तोंड न दाखवता, अशी स्थिती आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये ज्या वरिष्ठ कलाकारांमुळे रंगत येत होती, त्यांनाच वयाच्या अटीमुळे वगळावे लागले. त्यात एखादा कलाकार आजारी पडला तर संहिता, टॅ्रक, पात्र सगळ्यांचाच फेरविचार करावा लागतो. त्यात मालिकेला वेळेची मर्यादा असल्याने कमी कालावधीत ही सगळी मोट बांधताना धांदल उडते.’‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे आपले सेटवरचे अनुभव व्यक्त करताना म्हणाले, ‘मालिकेची कथा काळासोबत चालते. त्यामुळे करोनाचे वातावरण मालिकेतही दाखवावे लागते. बऱ्याच प्रसंगात कलाकारांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी असते. अशावेळी नेमके काय भाव दाखवायचे हा पेच असतो. शिवाय चित्रीकरणस्थळी माणसांची मर्यादा असल्याने मेहनत जास्त आणि उत्पादन कमी हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. प्रेक्षकांना काय नवीन दाखवायचे याचा विचार करताना प्रचंड ताण येतो.

लेखक अभिजित गुरू हे एकावेळी तीन ते चार मालिकांचे लेखन करतात. ‘ज्यावेळी मालिका सुरू होणार अशी बातमी आली, त्यावेळीच आम्ही तयारीला लागलो. परंतु सरकारी नियमावलीमुळे आमच्या संहितेचा रंग उडाला. लहान मुले, ज्येष्ठ कलाकार, दृश्यांबाबतच्या अटी यामुळे लिहिलेले बरेचसे भाग बदलावे लागले. आता संहितेला स्थळाची मर्यादा आल्याने पूर्वीसारखे वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

एखाद्या कलाकराची करोना चाचणी सकरात्मक येते तेव्हा भागाचे बरेचसे चित्रीकरण झालेले असते. फक्त एखादा प्रसंग चित्रित होणे बाकी असते. पण त्या कलाकाराविना तो प्रसंग पूर्ण होऊ शकत नसल्याने संपूर्ण भागाचेच पुनर्लेखन करावे लागते. त्यात तो कलाकार चौदा दिवस तिथे नसताना मालिका पुढे घेऊन जाणे हे लेखकांच्या हातात असते आणि याची प्रेक्षकांना कुठेही जाणीव होणार नाही, ही देखील दक्षता घ्यावी लागते.

– अभिजित गुरू, मालिका लेखक