मु्ंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनला येत्या ३० जुलै फाशी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलैला सकाळी सात वाजता त्याला फाशी देण्यात येणार आहे. मात्र,  याकुबला फाशी देण्याचे ठिकाण आणि तारखेत ऐनवेळी बदल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. याशिवाय, याकुब मेमनने सर्वोच्च न्यायालयाकडे फाशीपासून आपल्याला सुटका मिळावी, यासाठी केलेल्या दया अर्जाचा निकाल अद्यापही प्रलंबित आहे. मात्र, आम्ही आमच्या बाजूने याकुबला फाशी देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली . मेमनच्या फाशीची तारीख आणि वेळेबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच मान्यता दिली आहे.  कायद्यानुसार दोषी आणि त्याच्या कुटुंबाला फाशीच्या १५ दिवस अगोदर माहिती देणे न्यायालयाने बंधनकारक केले होते. त्यानुसार मेमन कुटुंबियांनाही फाशीच्या तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय येत्या येत्या २१ जुलै रोजी याकुबच्या दया अर्जावर निर्णय देणार आहे. न्यायालयाने याकुब मेमनचा दया अर्ज फेटाळल्यास राज्य सरकार याकुबला फाशी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करेल. टाडा कोर्टाने २००७ साली याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर याकुबने या शिक्षेविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयासह राष्ट्रपतींकडे दाद मागितली होती. मात्र, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील याकुबचा दया अर्ज फेटाळला होता.
याकुब हा मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख सुत्रधारांपैकी एक असणाऱ्या टायगर मेमनचा भाऊ आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यासाठी पैसे पुरवणे, दोषींच्या राहण्याची व्यवस्था, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणाची आणि प्रवासाची तिकीटे पुरवणे, बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली वाहने पुरवणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा अनेक आरोपांमध्ये याकुब मेमन दोषी आढळला होता. मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांना जीव गमवावा लागला होता, तर ७०० जण गंभीर जखमी झाले होते.

सीबीआयच्या दाव्यानूसार याकुबला दिल्लीत अटक करण्यात आली होती. मात्र, तो स्वत:हून भारतात परतला होता, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरण आलेल्या केलेल्या व्यक्तीला अशाप्रकारे फाशी द्यायची किंवा नाही, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. 

याकुब मेमनची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली