मुंबई : विविध बँकांकडून दहा हजार कोटींचे कर्ज मिळवून ते बुडविणाऱ्या एका विकासकाची येस बँक घोटाळ्याप्रकरणात चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या खास मर्जीतील हा विकासक असल्याचे सक्तवसुली महासंचालनालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

बँकांनी दिलेले कर्ज हे बुडविण्यासाठीच असते आणि दिलेल्या कर्जावर आणखी कर्ज घेण्याची पद्धत असते, असे मानणाऱ्या या विकासकाचे मुंबईत वांद्रे – कुर्ला संकुल, माझगाव येथे आलिशान प्रकल्प सुरू आहेत. मात्र यापैकी एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. मात्र या विकासकाच्या डोक्यावर दहा हजार कोटींचे कर्ज आहे.

हा विकासक एकेकाळी पश्चिम उपनगरातील व सध्या अडचणीत असलेल्या बडय़ा समूहात काम करीत होता. ही नोकरी सोडून २०१५ मध्ये स्वत:चा समूह उभा करणाऱ्या या विकासकाचे या काळात अनेकांशी जवळचे संबंध होते. त्यातून त्याने ऐपत नसतानाही संयुक्त भागीदारीत अनेक प्रकल्प ताब्यात घेतले. येस बँकेनेही शहानिशा न करता कर्ज दिल्याचा आरोप आहे. या विकासकाची चौकशी होणार असून त्यात तो अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राणा कपूर हे सध्या सक्तवसुली महासंचालनालयाच्या कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महासंचालनालयाने आता थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. यामध्ये रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांच्यासह आणखी काहीजणांना चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याचेही सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.