अंतर्गत वाद आणि गटबाजीचा फटका बसल्याने ‘शिवसेना’प्रणीत ‘युवा सेने’चा एकही उमेदवार यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदासाठी  (यूआर) होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात नसेल. त्यामुळे ही निवडणूक ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या (मनविसे) बाजूने एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
१५ जणांच्या विद्यापीठ प्रतिनिधी मंडळातून दरवर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष आणि सचिवाची निवड केली जाते. हे १५ सदस्य मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व विभागांमधून निवडलेले असतात. हे १५ सदस्य अध्यक्ष आणि सचिवांची निवड करतात. त्यासाठी १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची सोमवारी शेवटची मुदत होती.
आतापर्यंत विद्यार्थी प्रतिनिधी मंडळांच्या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावणाऱ्या युवा सेनेने  एकही अर्ज दाखल न करण्याची भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रात या मागील भूमिका स्पष्ट करताना या निवडणुकांमध्ये संघटनेला रस नसल्याचा खुलासा युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र असे असले तरीही यामागे ‘काही वेगळेच कारण’ असावे अशी चर्चा रंगली आहे. पुरेशा संख्याबळाचा अभाव हेच ‘रस नसण्याचे’ कारण आहे. आणि म्हणूनच महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकीत उतरणाऱ्या सेनेवर आता माघारीची वेळ आली, असे काहींचे म्हणणे आहे.
मनविसेतर्फे दालमिया महाविद्यालयाची रेश्मा पाटील आणि सीएचएम महाविद्यालयाचा पीयूष झेंडे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सचिव पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्याशिवाय एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत.१५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होऊन अध्यक्ष आणि सचिव यांची नावे जाहीर होतील. यंदा विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळात १४च उमेदवार आहेत. निवडणूक झाल्यास हे उमेदवार अध्यक्ष आणि सचिव यांची निवड बहुमताने करतील.
या निवडणुकीत सहभागी होण्याकरिता आवश्यक असलेले संख्याबळ युवा सेनेकडे नसल्यानेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची चर्चा आहे. कारण, युवा सेना कालपरवापर्यंत झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांच्या मैदानात उतरली होती. मात्र, अंतर्गत वादामुळे युवा सेनेला अर्जावर लागणारे पुरेसे अनुमोदकही जमा करता आले नाहीत, अशी चर्चा आहे.