क्षुल्लक भांडणाचा राग धरून शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय मुलाचा गळा चिरून त्यास इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दिवा येथे  घडला आहे. राहुल चव्हाण असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, याप्रकरणी आरोपी किरण तांबे यास पोलिसांनी अटक केली आहे.
दिवा पूर्व भागातील मरुसूबाई या इमारतीत पाचव्या मजल्यावरील दोन शेजाऱ्यांच्या भांडणातून ही निर्दयी घटना घडली आहे. आरोपी किरण (३८) हा संगणक नेटवर्किंगचे काम करतो. दोन लग्न झालेल्या किरणला दारूचे व्यसन आहे. त्याची एक पत्नी दिवा येथे तर दुसरी विक्रोळीत राहाते. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या किरणचे बायकोसोबत नेहमीच भांडण होत असे.
रविवारी याच कारणावरून त्याचे दिव्यात राहणाऱ्या पत्नीसोबत भांडण झाले. किरण पत्नीला मारहाण करीत असताना राहुल याचा लहान भाऊ लकी हा प्रकार पाहात होता. त्याला घरी जाण्यास सांगूनही तो न गेल्यामुळे किरणने त्यास खेचूनच घराबाहेर काढले. यावरून लकीचे वडील मुकेश आणि किरण यांच्यात भांडण झाले.
या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याने सोमवारी रात्री दारूच्या नशेत राहुल याला इमारतीच्या गच्चीवर नेले आणि दारूची बाटली आणण्यास सांगितली. मात्र राहुलने नकार दिल्यामुळे संतापाच्या भरात किरणने त्याचा विळीने गळा चिरून ठार मारल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.