विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाल्यानंतर आता विविधप्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे, आमिष दाखवण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून केले जात आहेत. मतदारांना वाटण्यासाठी नेल्या जाणाऱ्या नोटांची पोती हाती सापडत असतानाच आपली पोळी भाजून घेण्यासाठी वृत्तपत्रांना हाताशी धरून ‘पेड न्यूज’ छापल्या जाण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. केवळ मुंबईतच आतापर्यंत १२ उमेदवार ‘पेड न्यूज’च्या कचाटय़ात सापडले असून राज्यभरातही ‘बातम्यांची विक्री’ होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अर्थात ‘लोकसत्ता’ याला अपवाद!
प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारांना नाना आमिषे दाखवली जातात. यंदा तर प्रचार संपण्याच्या आधीपासूनच हे प्रकार सुरू झाले आहेत. मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येत असलेली ३ कोटी ६४ लाख ७१ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम यंत्रणांच्या हाती सापडली आहे.
स्वत:बाबत सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी वृत्तपत्रांतून ‘पेड न्यूज’ छापून आणण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबईत एकूण ७ उमेदवारांच्या १२ बातम्या ‘पेड न्यूज’ असल्याचा निर्वाळा मिडिया मॉनिटरिंग अँड सर्टिफिकेशन कमिटीने दिला आहे. यात काँग्रेसचे राजहंस सिंह (दिंडोशी), मनसेचे रईस लष्करिया (अंधेरी प.), भाजपचे मोहित कंबोज (दिंडोशी) व पराग अळवणी (विलेपार्ले) आणि शिवसेनेचे डॉ. विनय जैन (मालाड), शशिकांत पाटकर (विलेपार्ले) व तुकाराम काते (अणुशक्ती नगर) यांचा समावेश असून, त्याचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.
पेड न्यूजची सर्वाधिक ७८ प्रकरणे पुणे जिल्ह्य़ात
पुणे : राज्यातील पेड न्यूजची सर्वाधिक ७८ प्रकरणे पुणे जिल्ह्य़ात आढळली आहेत. त्यापैकी ७० प्रकरणांत संबंधित उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी चौदा उमेदवारांनी पेड न्यूज दिल्याचे मान्य करून ती रक्कम निवडणूक खर्चात जमा करण्यास सांगितले आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 candidates from mumbai found in paid news case
First published on: 14-10-2014 at 02:43 IST