मुंबईः  शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर गेल्या महिन्याभरात ३० हून अधिक वेळा सर्प दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेसह सर्प मित्रांनाही येथे तैनात करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने आतापर्यंत १२ सापांची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली आहे. त्यापैकी सहा सर्प विषारी होते. अशा परिस्थितीतही शिवडी येथील मतदान केंद्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही रेल्वे प्रवाशांचे हाल, लोकल खोळंब्याने प्रवासी त्रस्त

शिवडी येथील गाडी अड्डा येथील गोदामात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारण्यात आले होते. एरवी फारशी वर्दळ नसलेल्या या परिसरात मे महिन्याच्या सुरूवातीला मतमोजणी केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी पहिल्याच दिवशी मतमोजणी केंद्रामध्ये कवड्या जातीचा विनविषारी साप दृष्टीस पडला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण त्यावरही मात करत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्पमित्रांना तैनात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या ठिकाणी सहा विषारी नाग, चार धामण व दोन कवड्या जातीचे बिनविषारी साप सापडले. सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. 

हेही वाचा >>> पोर्शे घटनेच्या पार्श्वभूमीवर परवाना निलंबन कारवाईला आव्हान, बारमालकांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साप आपल्या जैविकसृष्टीचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांचेही संरक्षण व्हावे व कर्मचाऱ्यांनाही  त्यांच्यापासून इजा होऊ नये या उद्देशाने मी गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी कार्यरत असल्याचे सर्पमित्र सुनील कदम यांनी सांगितले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले असून घटनास्थळावर सहा इंजेक्शन व एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे थंडाव्याच्या शोधात साप बाहेर येतात. येथील खारफुटी व झाडाझुडपांमध्येही मोठ्या प्रमाणात सापांचे वास्तव्य आहे. त्यामुळे शिवडी परिसरात साप दिसल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या परिसरात किमान तीन सर्प मित्रांचा मृत्यू झाला आहे.