एमआरव्हीसीची योजना; पुढील वर्षी मार्चपासून सेवेत

जुन्या लोकल आणि होणारा त्रासदायक प्रवास यातून थोडय़ा प्रमाणात का होईना, पण हार्बर प्रवाशांची सुटका होणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर १३ नवीन लोकल दाखल करण्याची योजना मुंबई रेल्वे विकास महामंडळची आहे. या लोकल मार्च २०१८ पर्यंत दाखल होतील अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या नवीन बम्बार्डियर लोकल धावत आहेत. हवेशीर आणि आकर्षक अशा लोकल प्रवाशांच्या पसंतीसही उतरल्या. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या लोकल टप्प्याटप्प्यात मध्य रेल्वे मार्गावर दाखल करण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बरवर सिमेन्स कंपनीच्या लोकलबरोबरच जुन्या भेल आणि रेट्रोफिटेड लोकलही धावत आहेत. परंतु ज्या प्रमाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर नव्या लोकल गेल्या काही वर्षांत दाखल झाल्या त्या तुलनेत हार्बर मार्ग उपेक्षितच राहिला. आता मात्र हार्बर रेल्वे प्रवाशांना नवीन लोकलचा दिलासा मिळणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत १३ नवीन लोकल दाखल केल्या जाणार असून त्या हार्बर मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. बम्बार्डियर कंपनीच्या असणाऱ्या या लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफ (इंटिग्रल कोच फॅक्टरी) केली जाईल व त्यावर कामही सुरू करण्यात आले आहे. यातील प्रत्येकी एका लोकलची किंमत ४५ कोटी रुपये आहे.

नवीन लोकल हार्बर मार्गावर जरी चालवण्याचे नियोजन असले तरी त्याचा नेमका मार्ग ठरलेला नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात मुम्बई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रभात सहाय यांनी सांगितले की, १३ नवीन लोकलची बांधणी रेल्वेच्या आयसीएफमध्ये करण्यात येईल. हार्बरसाठी या लोकल असतील.

  • महत्वाची बाब म्हणजे वातानुकूलित नसलेल्या या एका लोकलची किंमत ४५ कोटी रुपये, तर सध्या मुंबईत दाखल झालेल्या आणि आयसीएफ फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या एसी लोकलची किंमत ५४ कोटी रुपये आहे.
  • आधीच मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ६७ एसी लोकल दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील ४७ लोकल मुंबईसाठी तर उर्वरित २० लोकल विरार-वसई-पनवेल या नवीन कोरिडोरसाठी असतील. यातील ४७ लोकलसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. २०२२-२३ सालापर्यंत एसी लोकल दाखल होतील.
  • सध्या हार्बरवर ३६ लोकल धावत असून त्याच्या ५९० फेऱ्या होतात. सर्व लोकल बारा डबा आहेत.