गणेशोत्सव म्हटल्यावर अनेक मोठ्या शहरांमधील मंडपातील गणपती हे भाविकांचे प्रमुख आर्कषण असते. अनेकजण तासन तास रांगा लावून मोठ्या मंडपातील गणपतींचे दर्शन घेतात. त्यातही मुबंईमध्ये लालबाग-परळ भागामधील अनेक गणपती मंडळे असल्याने दिवसाबरोबरच रात्रीही भाविकांची गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा संधीसाधू चोरट्यांनी घेतल्याचे चित्र यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. ‘लालबागचा राजा’ परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे खिसे कापण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सव सुरु झाल्यापासून अवघ्या चार दिवसांमध्ये ‘लालबागचा राजा’ परिसरातील पोलिसांकडे तब्बल १३५ मोबाइल चोरीच्या तक्रारींची नोंद झाली आहे.

नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहेत. याच कारणासाठी दरवर्षी राजाच्या दर्शनला भाविकांची मोठी रिघ लागते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. ‘लालबागचा राजा’ परिसरातील काळाचौकी पोलिस स्थानकात चार दिवसांत १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

मुंबईमधील लालबाग, परळ भागातील गणेशोत्सवाची ख्याती जगभरात आहे. या भागामध्ये अनेक लोकप्रिय आणि मोठी गणेश मंडळे असून दरवर्षी गणरायांच्या मोठ्या मुर्ती पाहण्यासाठी हजारो भाविक दहा दिवसांच्या कालावधीमध्ये या परिसराला भेट देतात. म्हणूनच सुरक्षेसाठी पोलिसांचा या परिसरात चोख बंदोबस्त असतो. मागील काही वर्षांपासून या परिसरावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरांचाही वापर केला जात आहे. इतक्या उपाययोजना करुनही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यावन वस्तूंवर हात साफ करताना दिसत आहेत. मागील काही वर्षांमध्ये गणेशोत्सव काळात या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांची आकडेवारी पाहता येथे सुरत गँग आणि यूपी गँग या दोन टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.