एक हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आणि ५४ टक्क्यांनी घटलेले प्रवासी भारमान अशा दुहेरी संकटाला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. प्रवासी भारमान वाढवून उत्पन्न वाढवत हा संचित तोटा कमी करण्यासाठी एसटीचे प्रयत्न चालू आहेत. रातराणी सेवेच्या तुलनेत कमी दर असलेल्या खासगी बसगाडय़ांकडे आकर्षित झालेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा रातराणी सेवेचा ‘सुगंध’ देण्यासाठी एसटी महामंडळाने रातराणी सेवेच्या दरात १५ टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवे दर १५ जानेवारीपासून लागू होणार आहेत. याबाबतची माहिती एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी मुंबई सेंट्रल येथे ‘सौजन्य अभिवादन’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
चार वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने रातराणी सेवेचे वेगळे दर निश्चित केले होते. एसटीच्या त्याच मार्गावरच्या इतर गाडय़ांच्या तुलनेत हे दर जादा होते. मात्र हे दर वाढल्यानंतर काही काळातच या सेवेला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला होता. दरम्यान, खासगी वाहतूकदारांनी आपल्या बसगाडय़ांचे दर कमी ठेवत एसटीसमोर आव्हान उभे केले. खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटीच्या रातराणी सेवेचे दर १५ ते २० टक्क्यांनी जास्त असल्याने प्रवाशांनी खासगी वाहतुकीला पसंती दिली होती.
मात्र एसटीच्या संचित तोटय़ाचा आणि घटलेल्या प्रवासी भारमानाचा विचार करता एसटीने प्रवासी वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एसटीचा संचित तोटा २०१२ मध्ये २९२ कोटी होता. २०१२-१३ मध्ये ४२८ कोटी रुपयांचा तोटा एसटीला झाला. तर २०१३ या आर्थिक वर्षांच्या ९ महिन्यांमध्येच एसटीला २९० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे एकूण संचित तोटा एक हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे, असे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. या तोटय़ाचा विचार करून प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने रातराणी सेवेसाठी लागू केलेले विशेष दर मागे घेतले आहेत. त्यामुळे रातराणी सेवेच्या दरांत १५ टक्के एवढी घसघशीत कपात होणार आहे. परिणामी खासगी वाहतुकीऐवजी प्रवासी एसटीच्या या रातराणी सेवेला प्राधान्य देतील, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. हे नवे दर १५ जानेवारीपासून लागू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.