मुंबई ते दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन राजधानी वातानुकूलित ट्रेनमध्ये महिन्याभरात १५ चोऱ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या वातानुकूलित आरामदायी प्रवासासाठी जादा पैसे मोजल्यानंतरही त्रासदायक होणारा प्रवास गेल्या एका महिन्यात पश्चिम रेल्वेवरील राजधानी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला आहे. १८ जुलै २०१७ ते १६ ऑगस्ट २०१७ या एका महिन्याच्या आत एक नाही, दोन नाही तर तब्बल १५ चोऱ्या मुंबई ते दिल्ली राजधानी आणि मुंबई ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी या दोन वातानुकूलित एक्स्प्रेसमध्ये झाल्याची माहिती समोर आली. प्रवाशांच्या किमती वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या चोरांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे चोरांची ‘राजधानी’ अशीच ओळख सध्या या गाडीची होत आहे.

गाडी क्रमांक १२९५१ आणि १२९५२ अशी मुंबई सेंट्रल ते दिल्ली अशी वातानुकूलित राजधानी ट्रेन आहे, तर ट्रेन नंबर १२९५३ ही मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती वातानुकूलित राजधानी दुसरी गाडी आहे.

संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना चांगलेच भाडे मोजावे लागते. मात्र मोजावे लागणारे भाडे आणि त्यातही सुरक्षित प्रवासाची नसलेली हमी याचा प्रत्यय या दोन्ही गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला आहे. १८ जुलै रोजी गाडी नंबर १२९५१ या दिल्लीहून मुंबई सेंट्रलला येणाऱ्या ट्रेनच्या ए-१ डब्यात एका प्रवाशाच्या सामानावर चोरांनी डल्ला मारला. त्यात दोन मोबाइल, रोख रक्कम आणि काही दागिने असा १ लाख ९५ हजार ५५० रुपयांची मालमत्ता चोरीला गेली.

चोरीच्या या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवली नाही आणि चोरीचा सिलसिला असाच महिनाभर सुरू राहिला. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी ट्रेन १२९५१ मुंबई सेंट्रल ते दिल्ली राजधानी गाडीतदोन आणि १५ ऑगस्ट रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या राजधानीमध्ये दोन चोरी झाल्या. राजधानी ट्रेनमध्ये चोरांनी धुमाकूळ घातल्यानंतर चोरांनी  गाडी क्रमांक १२९५३ ऑगस्ट क्रांती राजधानी ट्रेनमध्ये अक्षरश: लूट चालवली आणि १५ तारखेला मुंबईतून निघालेल्या आणि दुसऱ्या दिवशी पोहोचणाऱ्या या ट्रेनमध्ये एकाच दिवशी तब्बल दहा चोऱ्या झाल्या. ऑगस्ट क्रांती राजधानीमध्ये १० प्रवाशांची एकूण जवळपास १० लाख रुपयांची माालमत्ता चोरीला गेली.

राजधानी आणि ऑगस्ट क्रांती राजधानीतून चोरांनी प्रवाशांचे मोबाइल, सोने, रोख रक्कम लंपास केले. त्याचबरोबर बॅग किंवा पर्स चोरीला गेल्याने प्रवाशांचे पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, लायसन्सही चोरीला गेले असल्याची माहिती, रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.  राजधानीमध्ये घडलेल्या घटनांनंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबपर्यंत एका राजधानी गाडीत सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण केले जाईल.

तपास सुरू असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. यासंदर्भात मोठा खुलासाही करण्यात येईल. चोरीला गेलेली मालमत्ताही मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

-शरद सिंघल -पोलीस अधीक्षक, जीआरपी-बडोदा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 robbery incident in mumbai delhi rajdhani express within a month
First published on: 10-09-2017 at 04:35 IST