scorecardresearch

एसटी पूर्वपदाकडे ; दिवसभरात १६ हजार कर्मचारी कामावर रूजू

संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होत़े  त्यानंतर कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढू लागले.

st-bus-1-2
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून विस्कळीत असलेली एसटी सेवा पूर्वपदावर येण्याचे संकेत आहेत़  सोमवारी एकाच दिवशी १६ हजार १५४ एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले. त्यात चालक, वाहकांची संख्या अधिक आहे.

एसटी महामंडळात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ आहे. हे सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरूवातीपासून संपात सहभागी झाले होते. मात्र, निलंबन, बडतर्फ, सेवासमाप्ती कारवाई करतानाच ४१ टक्के दिलेली वेतनवाढ आणि कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या मुदतीनंतर हळूहळू कर्मचारी कामावर रूजू होत होते. सोमवारी मात्र मोठय़ा प्रमाणात कर्मचारी सेवेत रुजू झाले. आतापर्यंत सेवेत आलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६१ हजार ६४७ झाली आहे.  संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होत़े  त्यानंतर कर्मचारी कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढू लागले. ८ एप्रिलला ५३ कर्मचारी सेवेत आले. ९ एप्रिलला ही संख्या ७४३ होती. १२ एप्रिलला १,५६९, तर १५ एप्रिलला १,५६१ आणि १६ एप्रिलला १,८७५ कर्मचारी रुजू झाले. १८ एप्रिलला मात्र १६ हजार १५४ कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी कर्तव्यावर हजर झालेल्या १६ हजार १५४ कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार ६६९ चालक, ५ हजार ७८६ वाहकांचा समावेश आहे. उर्वरित  कर्मचारी हे विविध विभागांतील आहेत. नाशिक प्रदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई प्रदेशातील मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पुणे प्रदेशातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथील सर्वाधिक कर्मचारी सोमवारी कामावर परतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16000 msrtc employees rejoin duty on monday zws