17-Year-Old boy electrocuted in Bhandup Mumbai Video : मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये, रस्त्यांवर पाणी साचल्याच्या गटना घडल्या. दरम्यान अशा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कानात हेडफोन लावून प्रवास करणे एका १७ वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. भांडुपच्या पन्नालाल कंपाउंड परिसरात शॉक लागून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

भांडुप येथील एलबीएस मार्गावरून आपल्या घराच्या दिशेने जात असताना आयुषमान रुग्णालयासमोरील मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावरील फीडर पिलरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. दिपक अजय रामलिंगम पिल्लाई (१७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम…

ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या दिनेश जैन यांनी नेमकं काय घडले याबद्दल माहिती दिली, त्यांनी सांगितलं की, काल येथे करंट येत होतं. त्यावेळी खूप लोकं येथून जात होते. त्यानंतर आम्ही येथे दोरी देखील बांधली, आवाज देखील दिला की तिकेडे जाऊ नका. पण एक कोणीतरी बिचारा व्यक्ती इथून जात होता. त्याने पाठीवर बॅग अडकवली होती. मी त्याला आवाज दिला पण त्याने ऐकलं नाही.कारण त्याने कानात हेडफोन घातलेले होते, त्यामुळे त्याला ऐकू गेले नाही. तो थेट तेथे जाऊन चिकटला आणि नंतर खाली पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, काही मिनिटे तरुण पाण्यातच पडून होता. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ त्याला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या आयुषमान रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.