‘म्हाडा’च्या १२४४ घरांसाठीची सोडत ३१ मे रोजी निघणार असली, तरी सुमारे १८ अर्जदार त्याआधीच ‘म्हाडा’च्या घरांचे भाग्यवंत विजेते ठरले आहेत. काही गटांत उपलब्ध घरांइतकेच अर्ज आणि उपलब्ध घरांपेक्षा कमी अर्ज आल्याने या अर्जदारांना सोडतीआधीच घराची ‘लॉटरी’ लागली आहे, तर सुमारे १५ घरांसाठी एकही अर्ज आला नसल्याचे प्राथमिक चित्र आहे. अर्थात मंगळवारी सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम होणार असल्याने या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘म्हाडा’ने यंदा मुंबई मंडळातील १२४४ घरांसाठी अर्ज मागवले होते. त्यासाठी ९३,५५९ अर्ज आले आहेत, अशी माहिती अॅक्सिस बँकेने ‘म्हाडा’कडे दिल्याचे समजते. अर्जाच्या छाननीत ४८ अर्ज अनामत रक्कम भरण्यातील गोंधळ आणि अन्य काही कारणास्तव बाद ठरले आहेत. तर ५९६१ अर्जामध्ये पॅनकार्ड, बँक तपशील आदी काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते बाद करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. ‘म्हाडा’च्या सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी आणि अशा त्रुटी आढळलेल्या ५९६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ५९६१ जणांना मंगळवारी दुपापर्यंत आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. यातून काही अर्जदार पुन्हा सोडतीच्या रिंगणात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम होईल.
‘म्हाडा’च्या घरांसाठी अनुसूचित जाती-जमातीपासून ते लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील कर्मचारी, माजी सैनिक, सरकारी कर्मचारी अशा विविध गटांसाठी घरे राखीव असतात. अशा राखीव गटांत काही ठिकाणी एका घरासाठी एकच अर्ज तर काही ठिकाणी उपलब्ध घरांपेक्षा कमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी सुमारे १८ अर्जदारांना सोडतीआधीच ‘म्हाडा’च्या घराची लॉटरी लागली. सोडतीआधी घराची लॉटरी लागणाऱ्या भाग्यवंतांमध्ये प्रामुख्याने आमदार-खासदार, संरक्षण दलातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
सुमारे १५ गटांत उपलब्ध घरांसाठी एकही अर्ज आला नाही वा कमी अर्ज आल्याने जवळपास १५ घरांसाठी अर्जदार नाही, असे चित्र समोर आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2013 रोजी प्रकाशित
सोडतीआधीच म्हाडाच्या घरांचे १८ भाग्यवंत
‘म्हाडा’च्या १२४४ घरांसाठीची सोडत ३१ मे रोजी निघणार असली, तरी सुमारे १८ अर्जदार त्याआधीच ‘म्हाडा’च्या घरांचे भाग्यवंत विजेते ठरले आहेत. काही गटांत उपलब्ध घरांइतकेच अर्ज आणि उपलब्ध घरांपेक्षा कमी अर्ज आल्याने या अर्जदारांना सोडतीआधीच घराची ‘लॉटरी’ लागली आहे, तर सुमारे १५ घरांसाठी एकही अर्ज आला नसल्याचे प्राथमिक चित्र आहे.
First published on: 28-05-2013 at 04:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 lucky member get mhada flats before draw