2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted : आजच्या निकालाने गेल्या १७ वर्षांत मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. एक समाधानी संन्यासी जीवन जगत होते. पण मला, भगव्याला दहशतवादी ठरवण्यात आले. माझा अतोनात छळ करण्यात आला. मात्र आज मला आणि भगव्याला न्यायालयाने न्याय दिला आहे. मला आणि भगव्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, अशी भावना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निकालानंतर न्यायालयासमोर व्यक्त केली.

खटल्यातून निर्दोष सुटका झाल्याचे आणि तपास यंत्रणा एकही आरोप सिद्ध करू शकल्या नाहीत हे न्यायालयाने समजावून सांगितल्यानंतर साध्वी यांनी गेल्या १७ वर्षांत त्यांना काय सहन करावे लागले हे भावूक होऊन सांगितले. संन्यासी, समाधानी जीवन जगत होते. पण दहशतवादी ठरवून मला अटक करण्यात आली आणि माझा अतोनात छळ करण्यात आला. माझे आयुष्य उध्वस्त केले. गेल्या १७ वर्षांत असह्य अपमान सहन करावा लागला. दहशतवादी म्हणून लोकांच्या नजरा सहन कराव्या लागल्या. केवळ संन्यासी आहे म्हणून अजून जगले, असेही साध्वी यांनी न्यायालयाला सांगितले.

सतरा वर्षांनी न्याय मिळाला आहे. एवढ्या वर्षांत पहिल्यांदा आनंदी झाले आहे. आजच्या निकालाने केवळ माझा नाही, तर भगवा आणि हिंदुत्त्वाचा विजय झाला आहे. मला, भगव्याला आणि हिंदुत्त्ववादाला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, असे भावूक झालेल्या साध्वी यांनी न्यायालयाला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.