2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted : मालेगाव येथील २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरण २०११ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले. एकीकडे, एनआयएकडून तपास सुरू असताना ज्या कबुलीजबाबांच्या आधारे आरोपींना मोक्का लागू करण्यात आला, त्या आदेशाला आरोपींनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर, १३ मे २०१६ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने आरोपींवरील मोक्का हटवत असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणी मोक्का लावण्याच्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.
अटक केलेल्या ११ जणांपैकी फक्त सातजणांविरुद्ध आणि दोन फरारी आरोपी, तर कलसंग्रा आणि संदीप डांगे यांच्याविरुद्ध पुरावे उपलब्ध असल्याचे एटीएसने म्हटले होते. परंतु, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर नोंदणीकृत असलेली मोटारसायकल कलसंग्रा याच्या ताब्यात होती आणि ती स्फोटापूर्वी वापरत असल्याचे एनआयएने म्हटले होते. शिवाय, मोक्का लागू नसल्याने त्या कायद्याअंतर्गत नोंदवलेला साध्वी यांचा कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असेही एनआयने म्हटले होते. साध्वीच्या कबुलीजबाबानुसार, सह-आरोपींना स्फोटकांची व्यवस्था करण्यासाठी ले. कर्नल प्रसाद पुरोहितला बोलावले होते.
आरोपींविरुद्ध एटीएसचा खटला हा पूर्णपणे कबुलीजबाबांवर आधारित होता. परंतु, चतुर्वेदीचा कबुलीजबाब हा त्याचा छळ, जबरदस्ती नोंदवला होता. या प्रकरणी तपासात बराचसा वेळ निघून गेल्याने घटनास्थळावरून कोणतेही अतिरिक्त पुरावे मिळू शकले नाहीत, असे एनआयएने म्हटले आरोपपत्रात म्हटले होते. एटीएसच्या तपासात विसंगती असल्याची सबब पुढे करून एनआयएने काही साक्षीदारांचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर पुन्हा नोंदवले होते. काही साक्षीदार हे सूड आणि स्फोटाबद्दल झालेल्या भोपाळ आणि फरिदाबादमधील बैठकांमध्ये उपस्थित असल्याचा दावा एटीएसने केला होता. परंतु, ते साक्षीदार कथित बैठकांमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांनी अशी कोणतीही चर्चा ऐकली नसल्याचे एनआयएने सांगितले . तसेच, एटीएसने आरोपींना गोवण्यासाठी खोटे पुरावे तयार केले. देवळाली येथील चतुर्वेदीच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून पुरावे लपवले ही बाब दोन लष्करी अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्याचा दावाही एनआयएने आरोपपत्रात केला होता.