निवडुणीच्या काळात बेहिशोबी रोकड जप्त करण्याचे सत्र सुरू आहे. गुरूवारी भांडुप पोलिसांनी २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
 भांडुप पश्चिमेच्या लाल बहादुर शास्त्री मार्गावर नाकाबंदी सुरू असताना एका रिक्षाच्या तपासणीत ही रोकड आढळली. भाजीच्या पिशवीत हे पैसे लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी शौकतअली खान (६०), रामप्रसाद यादव (३६) आणि इमाउल खान (३०) या तिघांना अटक केली आहे. या पैशांबाबत ते योग्य ते पुरावे किंवा समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
झेंडूचा बाजार फुलला
मुंबई: उद्या साजऱ्या होणार असलेल्या विजयादशमीच्या सणानिमित्त झेंडूच्या फुलांनी बाजार फुलला असून आज सर्वत्र ही फुले खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती.
दसऱ्याच्या सणात झेंडूच्या फुलांना महत्त्व आहे. एरवी झेंडू वर्षभर बाजारात असतो, परंतु दसरा आणि गुढीपाडव्याला त्याची मागणी वाढते. सध्या सुमारे १ लाख किलो इतक्या मोठय़ा प्रमाणात झेंडू मुंबईच्या विविध बाजारात येतो आहे.  झेंडूशिवाय शेवंतीचीही फुले मोठय़ा प्रमाणात बाजारात आली आहेत. दादर, भुलेश्वर, बोरिवली इ. ठिकाणी या फुलांचा घाऊक बाजार असून, इतर ठिकाणी त्यांची घाऊक विक्री होते. दसऱ्यानिमित्त दारावर तोरण लावण्यासाठी आवश्यक असलेल्या आंब्याच्या डहाळ्यांचीही आज जोरदार विक्री झाली. फुलांची मागणी वधारल्यामुळे फुलांचे विक्रेते खुषीत होते, मात्र फूलविक्रेत्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे विशेषत: दादर आणि भुलेश्वर येथे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना त्रास होत होता.