केंद्रीय आरोग्य विभागाची संमती; पाहणी केल्यानंतर केंद्रे सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी,

मुंबई : करोना लसीकरणाला वेग देण्यासाठी आता २९ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू होणार असून केंद्रीय आरोग्य विभागाने मंगळवारी याला परवानगी दिली आहे. रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर तात्काळ ही केंद्रे सुरू करण्यात येतील.

दरम्यान, एकीकडे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी रुग्णांना नोंदणीसाठी उपलब्ध केलेले संकेतस्थळ मंगळवारीही बंद होते, तर दुसरीकडे ‘कोविन अ‍ॅप’मधील तांत्रिक बिघाड यांमुळे राज्यात इतर भागात लसीकरण कमी झाले असले तरी मुंबईत उद्दिष्टाच्या १२२ टक्के लसीकरण झाले आहे. मंगळवारी राज्यात १२ हजार २९९ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असून मुंबईत ६,२६३ जणांना लस दिली गेली. सर्वाधिक लसीकरण (२,५६१) गर्दी झालेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) करोना केंद्रात झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये विविध विमा योजनेअंतर्गत असलेल्या सरकारी रुग्णालयांना समाविष्ट करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले होते. परंतु नोंदणी संकेतस्थळ, अ‍ॅपमधील त्रुटी आणि केंद्रावरील लाभार्थ्यांची गर्दी लक्षात घेता खासगी रुग्णालयांना समाविष्ट करण्याची मागणी पालिकेने आरोग्य विभागाला केली होती. याला हिरवा कंदील दाखवत आरोग्य विभागाने २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास संमती दिली आहे.

‘खासगी रुग्णालयांचा समावेश झाल्यामुळे केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि लसीकरणही वेगाने होऊ शकेल. तपासणीनंतर लगेचच केंद्र कार्यान्वित केली जातील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

काय झाले ?

लसीकरण केंद्रावर नागरिकांची नोंदणी आणि फेरपडताळणीसाठी ‘कोविन अ‍ॅप’चा वापर केला जात असून त्यासाठी लसीकरण केंद्राना खास अधिकार दिले आहेत. त्यामुळे केंद्रावर नोंदणी होते. परंतु सामान्य नागरिकांना नोंदणी संकेतस्थळाद्वारेच करता येते. केंद्रीय आरोग्य विभागाने http://www.cowin.gov.in किंवा selfregistration.cowin.gov.in ही संकेतस्थळे यासाठी १ मार्चपासून सुरू केली. मात्र पहिल्याच दिवशी दोन तासांतच बंद पडलेले हे संकेतस्थळ बुधवारीही सुरू झाले नाही. त्यामुळे पालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे संकेतस्थळ सुरू झाल्यास ठरावीक वेळेतच नागरिक येऊ शकतील आणि ते केंद्रांना सोयीचे होईल, असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या रुग्णालयांचा समावेश

शुश्रूषा रुग्णालय आणि संशोधन केंद्र (विक्रोळी), के. जे. सोमय्या रुग्णालय, नानावटी रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, सैफी रुग्णालय, पी. डी. हिंदुजा रुग्णालय, एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, कौशल्या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्ट, मसिना रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, एस. एल. रहेजा रुग्णालय, लीलावती रुग्णालय, गुरुनानक रुग्णालय, बॉम्बे रुग्णालय, ब्रीचकॅण्डी रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय (मुलुंड), भाटिया रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, सर्वोदय रुग्णालय, जसलोक रुग्णालय, करुणा रुग्णालय, एच. जे. दोशी हिंदूसभा रुग्णालय (घाटकोपर), एसआरसीसी चिल्ड्रन्स रुग्णालय, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय, कॉनवेस्ट जैन रुग्णालय, सुराणा सेठिया रुग्णालय, होली स्पिरिट रुग्णालय, टाटा रुग्णालय.

लशीच्या दोन मात्रांसाठी ५०० रुपये

खासगी रुग्णालयांमध्ये एका मात्रेसाठी २५० रुपये याप्रमाणे दोन मात्रांचे ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

लस घेण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रामध्ये गर्दी झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29 private hospital giving corona vaccination dd
First published on: 04-03-2021 at 01:06 IST