अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील आर. के. केमिकल्स कंपनीत वायुगळती झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्याचा त्रास शेजारी असलेल्या प्रेस पीट पाईप अँड प्रोफाईल या कंपनीतील कामगारांना होऊन ३४ कामगार अत्यवस्थ झाले. आनंदनगर औद्योगिक वसाहतीत एन १०/१ येथील आर.के. केमिकल या कंपनीत मंगळवारी सकाळी सल्फ्युरिक वायूची गळती झाली. वायू गळती झालेली वाहिनी शेजारच्या प्रेस फीट पाईप एँड प्रोफाईल या कंपनीच्या दिशेने होती. त्यामुळे आर.के. केमिकल या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही. परंतु गळतीचा फटका प्रेस फीट पाईप अ‍ॅण्ड प्रोफाईल या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसला. या कंपनीतील ३४ कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही कर्मचाऱ्यांना उपचारानंतर  घरी सोडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस, एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी सांगितले की, कंपनीतील निष्काळजीमुळे हा प्रकार झाला असून याप्रकरणी कामकाज बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.