मुंबई महापालिकेचा नगरविकास विभागाला प्रस्ताव; वाढीव चटई क्षेत्रफळ अपुरे असल्याचा रहिवाशांचा दावा

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांना अखेर चार ते नऊ इतके अतिरिक्त चटई क्षेत्रफळ देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविला आहे. या प्रस्तावानुसार विलेपार्ले आणि सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ इतके चटई क्षेत्रफळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यानिमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) इतरत्र वापरण्याबाबत नव्या विकास आराखडय़ात सुधारणा करावी लागणार आहे.

चटई क्षेत्रफळ वापरावरील निर्बंधामुळे या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला होता. नगरविकास विभागाने याबाबत निर्णय घेतल्यास एअरपोर्ट फनेलवासीयांच्या सुमारे साडेचारशे इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे. या इमारतींसाठी फक्त एक इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध होते. त्यामुळे कुणीही विकासक पुढे येत नव्हते. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळ वजा जाता उर्वरित चटई क्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. नव्या विकास आराखडय़ात त्याबद्दल उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता.

शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार आणि स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांनी या मागणीस अनुकूलता दर्शवली. त्यानंतर याप्रकरणी पालिकेची छाननी समिती नेमण्यात आली. त्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठविला आहे. या प्रस्तावानुसार या रहिवाशांना चार ते नऊ चटई क्षेत्रफळ प्रस्तावित करण्यात आले आहे.

‘प्रस्तावित चटई क्षेत्रफळही अपुरे’

पालिका आयुक्तांच्या पत्रातील उपाययोजना अपुरी आहे. प्रस्तावित चटई क्षेत्रफळ आणि प्रस्तावित बांधकामासाठी वापरले जाणारे चटई क्षेत्रफळ वजा केल्यास उर्वरित चटई क्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र पालिकेच्या छाननी समितीने नव्या बांधकामाचा दर रेडी रेकनरनुसार धरला असून तो तीन वर्षांपूर्वीचा आहे. आजचा दर अधिक आहे. शिवाय त्यावर वस्तू व सेवा कर गृहीत धरला तर दर अधिक होतो; परंतु तो विचारात घेतला गेला नाही. त्यामुळे प्रस्तावित केलेले हे चटई क्षेत्रफळ पुरेसे नाही, ही बाब छाननी समितीपुढे वेळोवेळी मांडली होती; परंतु ती विचारात घेतली गेली नाही, असे एअरपोर्ट फनेलवासीयांचे प्रतिनिधी विश्वजित भिडे यांनी सांगितले.

पालिका आयुक्तांचा प्रस्ताव हा अंतिम नाही. नगरविकास विभागाकडून त्यात सुधारणा होऊ शकते. पुनर्विकासासाठी लागणारा खर्च बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या चटई क्षेत्रफळाच्या टीडीआर विक्रीतून उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या दिशेने आपण मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.

– आशीष शेलार, शालेय शिक्षणमंत्री