सुदृढ लोकशाही व्यवस्थेसाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगितले जात असले तरी राज्यातील तरुणांनी मतदार होण्याबाबत कमालीचा निरुत्साह दाखविला आहे. मतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार तब्बल ४५ लाखांहून अधिक तरुणांनी नावनोंदणी प्रक्रियेपासून अलिप्त राहून एकप्रकारे निवडणूक प्रक्रियेकडेच पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०११ च्या जनगणना आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या ३८ लाख ९४ हजार ५८९ असली तरी त्यापैकी अवघ्या १० लाख ७५ हजार ३७६ जणांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे. या वयोगटातील ७२ टक्के तरुण पात्र असूनही अद्याप निवडणूक प्रक्रियेपासून दूर आहेत. त्याचप्रमाणे २० ते २९ वयोगटातीलही साडेदहा टक्के तरुणांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील या वयोगटातील लोकसंख्या १ कोटी ६८ लाख २९ हजार १३ असून त्यापैकी १ कोटी ५० लाख ५५ हजार १८० तरुणांनीच मतदार यादीत नाव नोंदविले आहे. म्हणजे उर्वरित १७ लाख ७३ हजार ८३३ तरुणांनी निवडणूक प्रक्रियेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. म्हणजे एकूण १८ ते २९ वयोगटातील तब्बल ४५ लाख ९३ हजार ४६ तरुण येत्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाहीत.
येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित असून त्याची घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग तसेच शासकीय यंत्रणा जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, यासाठी प्रचार आणि प्रबोधन करीत आहे. विविध राजकीय पक्षांनीही व्होट बँक वाढविण्यासाठी मतदार नोंदणी अभियान राबवीत आहेत. मात्र तरीही पुरोगामी महाराष्ट्रातील तरुण निवडणूक प्रक्रियेविषयी फारसा गंभीर नसल्याचेच जाहीर मतदार नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अजूनही संधी
मतदार पुनरीक्षण मोहिमेची आकडेवारी जाहीर झाली असली तरी अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या तरुणांना अजूनही एक संधी आहे. येत्या महिन्याअखेरीस निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नावे नोंदवावीत, असे आवाहन सूत्रांनी केले आहे.