विम्यासाठी दानशूरांचा शोध सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही स्वरूपात मानधन वा मोबदला न घेता गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी समुद्रात तैनात राहणाऱ्या खासगी संस्थांच्या तब्बल ५०० हून अधिक जीवरक्षकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावरच असून त्यांना विम्याचे कवच लाभावे यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पालिकेकडून मदतीचा हात मिळत नसल्याने आणि समितीच्या तिजोरीत निधीचा खडखडाट असल्यामुळे समन्वय समितीने दानशूरांच्या शोध सुरू केला आहे. दानशूरांकडून मदत मिळाल्यास जीवरक्षकांना विम्याचे कवच लाभणार आहे, अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी धोका पत्करून खासगी जीवरक्षकांना समुद्रात सज्ज राहावे लागणार आहे.

दीड दिवस, पाचवा, गौरी-गणपती, सातवा आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमधील गिरगाव, दादर, जुहू यासह विविध चौपाटय़ांवर गणेश विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक चौपाटय़ांवर येत असतात. गणरायाला निरोप देण्यासाठी काही भाविक समुद्रात उतरतात. काही जण गणेशाची मूर्ती खांद्यावर घेऊन खोल समुद्रात ती विसर्जन करण्यासाठी जातात. या वेळी काही जण समुद्राच्या पाण्यात हुल्लडबाजी करीत असतात. अशा वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. गणेश विसर्जन सोहळ्यात भाविक समुद्रात बुडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जलसुरक्षा दल, एच २ ओ मरिन टेक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वॉटर सेफ्टी पेट्रोल, जुहू बीच लाइफ गार्ड असोसिएशन यासह काही खासगी संस्थांचे तब्बल ५०० हून अधिक जीवरक्षक स्वेच्छेने गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रात तैनात असतात. या जीवरक्षकांना पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे मानधन, अथवा मोबदला दिला जात नाही. केवळ सेवाभावी वृत्तीने ही मंडळी विसर्जनाच्या वेळी संपूर्ण दिवस समुद्रात तैनात असतात. सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणेही त्यांना उपलब्ध केली जात नाहीत. सेवाभावी वृत्तीने केवळ भाविकांचे प्राण वाचविण्यासाठी समुद्रात सज्ज राहणाऱ्या खासगी जीवरक्षकांचा विमा काढण्याचा निर्णय बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने घेतला आहे. जीवरक्षकांचा विमा काढण्याबाबत समन्वय समितीने विमा कंपनीशी बोलणेही सुरू केले आहे. मुंबईमधील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या समन्वय समितीकडे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे समितीच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे जीवरक्षकांचा विमा कसा काढायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा नाही आणि आपल्या तिजोरीत पैसा नाही, अशा पेचात असलेल्या समन्वय समितीने आता दानशूरांच्या मदतीने जीवरक्षकांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी दानशूरांचा शोध सुरू केला आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. किमान दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनापूर्वी जीवरक्षकांना विम्याचे अभय मिळवून देण्याचा समन्वय समितीची मानस आहे. परंतु अद्यापही दानशूरांकडून मदतीचा हात पुढे आलेला नाही. त्यामुळे मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना साकडे घालण्याचा समन्वय समितीचा विचार आहे.

खासगी जीवरक्षक केवळ सामाजिक बांधिलकीने गणेश विसर्जनाच्या वेळी सेवा करीत असतात. या संकटमोचकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. त्यामुळे त्यांना विम्याचे कवच मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दानशूरांनी अथवा गणेश मंडळांनी मदतीचा हात पुढे केल्यास जीवरक्षकांनाही विमा कवच मिळू शकेल.

– अ‍ॅड्. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 lifeguard future in dark
First published on: 22-08-2017 at 03:29 IST