दिवसभरात २,२३६ बाधित; ४४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना रविवारी तब्बल पाच हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. इतक्या संख्येने रुग्ण करोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, मुंबईतील २,२३६ जणांना रविवारी करोनाची बाधा झाली, तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला.

गणेशोत्सवानंतर दररोज मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येत दोन हजार रुग्णांची भर पडत आहे. परिणामी, करोनाबाधितांची संख्या एक लाख ८४ हजार ३१३ वर पोहोचली आहे. रविवारी ४४ जण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी ३३ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३३ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश होता. आतापर्यंत मुंबईतील आठ हजार ४६६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे पाच हजार ३८ रुग्ण रविवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख ४७ हजार ८०७ रुग्ण करोनाबाधित झाले आहेत.

गेले काही दिवस सातत्याने उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र रविवारी मोठय़ा संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली. मुंबईत आजघडीला २७ हजार ६६४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

महापौर करोनामुक्त

’ करोनाची बाधा झाल्यामुळे सेवन हिल्स रुग्णालयात दाखल असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून पुढील १४ दिवस गृह विलगीकरणात राहणार आहेत.

’ ९ सप्टेंबर रोजी केलेल्या चाचणीत त्यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले होते. तात्काळ त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या सेवन हिल्स रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची पुन्हा करोना चाचणी करण्यात आली असून ती नकारात्मक आली आहे.

१० लाख चाचण्या

करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी पालिकेने मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दररोज १५ हजारांच्या आसपास  चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मार्चपासून आतापर्यंत १० लाख चार हजार १७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.