आंतरधर्मीय विवाह आणि सरकारी कागदपत्रात कसूर राहिल्याने वर्षभरात तब्बल ५२४ जणांनी धर्मातर करून ‘राजपत्रा’त नोंदणी करून घेतली आहे. राज्य सरकारच्या मुद्रण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या यादीतून ही माहिती समोर आली आहे. यात हिंदू ते मुस्लीम धर्मातर करून राजपत्र मिळवण्याच्या यादीत २००, मुस्लीम ते हिंदू धर्मात ७३, हिंदू ते बौद्ध धर्मात ६५, ख्रिश्चन ते हिंदू धर्मात ३२, हिंदू ते जैन धर्मात ४३ आणि नवबौद्ध ते हिंदू धर्मात ४ जणांचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नियमानुसार ही केवळ जाहिरात असल्याने सरकार कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे नियमात नमूद करण्यात आले आहे.
वर्षभरात जन्मदाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्रात झालेल्या चुकीमुळे आणि आंतरधर्मीय विवाह केल्याने धर्म बदलण्याच्या जाहिरातींत ५२४ जणांची नोंद झाली आहे.
२०१५-१६ या वर्षभराच्या आकेडवारीनुसार हिंदू ते नवबौद्ध ९, मुस्लीम ते ख्रश्चन १०, मुस्लीम ते बौद्ध २, ख्रिश्चन ते बौद्ध ६, ख्रिश्चन ते मुस्लीम ११, जैन ते हिंदू १ , जैन ते मुस्लीम २, बौद्ध ते मुस्लीम ६, बौद्ध ते ख्रिश्चन २, शीख ते ख्रिश्चन १, शीख ते मुस्लीम १, इतर ते जैन १, इतर ते मुस्लीम ६, इतर ते हिंदू ८ आदींचा धर्म बदलण्याच्या जाहिरातींच्या यादीत समावेश असल्याचे पाहायला मिळते. हिंदू धर्मातून मुस्लीम धर्मात नाव बदलून घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.
* कोणतीही पडताळणी न करता अर्जदारांनी अर्जात केलेल्या माहितीवर आधरित ही जाहिरात असल्यामुळे, जाहिरातीतील मजकुराबाबतच्या सत्यतेविषयी राज्य सरकार कुठलीच जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे नियमात नमूद करण्यात आले आहे, असे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
* धर्म बदलण्याची जाहिरात करून राजपत्र मिळवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात या कागदपत्राचा उपयोग होत नसला तरी खासगी कंपनीत राजमुद्रा असलेल्या कागदपत्रांच्या आधारे गैरवापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.