‘गाडी येत आहे, कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका..’ मायभाषेसह राष्ट्रभाषा आणि इंग्रजीत सांगितल्या जाणाऱ्या या धोक्याच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करून घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटना सर्रास घडतात. मात्र, गेल्या आठवडय़ात या घटनांनी टोक गाठले. १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत रल्वेच्या तीनही मार्गावर अशा तब्बल १५० घटना घडल्या. त्यात ६८ जणांना जीव गमवावा लागला तर ८७ जण अद्याप मृत्यूशी झुंज देत आहेत. बहुतांश अपघात (७१) मध्य रेल्वेमार्गावर घडले असून त्यात ३४ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जबर जखमी झाले. रेल्वेमार्गावर होणाऱ्या या अपघातांबाबत लोहमार्ग पोलीसही काळजी व्यक्त करत आहेत.
लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य, पश्चिम आणि हार्बर या mn06तीनही मार्गावर मिळून गेल्या रविवारपासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून अपघाताच्या दीडशेहून अधिक घटना घडल्या. या अपघातांच्या घटनांपैकी शंभराहून अधिक घटना रेल्वेरूळ ओलांडताना घडल्या आहेत. यात कल्याण आणि ठाणे परिसरात घडलेल्या घटनांची संख्या लक्षणीय आहे. ६८ मृतांपैकी १२ जणांचा मृत्यू कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झाला असून ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सर्वाधिक घटना मुंबई सेंट्रल, पालघर आणि वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत.